पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ७७

मिळत होते. तस्मात् अशा अनियमित राज्यांत राहणे मोठे दुर्भाग्य होय. व यावरून असे दिसे की मुख्य नशीब म्हणण्यास कारण हेच आहे. जर व्यवस्था सारखी होईल व योग्यतेनुरूप प्रतिष्ठा वाढेल तर नेम झाला. मग कोणी प्रारब्ध म्हणणार नाही. जोपर्यंत राज्य बेबंद आहे तोपर्यंत नशीब हा शब्द लोक उच्चारतील. कारण त्यांस त्याचा दाखला प्रत्यक्ष येतो की, शहाण्याचा वेडा आणि वेड्याचा शहाणा घटकेत होतो. यास्तव असे होऊ नये म्हणून कायदे व शास्त्र असले पाहिजे. मनुष्याचा धर्म हाच आहे की, जोपर्यंत आपली अक्कल चालेल तोपर्यंत त्याने चांगले होण्याचा मार्ग स्थापन करावा. उद्योग सोडू नये. उद्योगाने फळ येत नाही, असे होण्यास कारण मनुष्यच आहेत. राजा चांगला असेल तर वाईट कोण, चांगला कोण, याची निवड होईल.
 वर्तमानपत्रे असावी, याचे कारण हेच आहे की, सरकारांनी किंवा कोणीही अन्याय केला तर तो प्रकट होतो व येणेकरून त्याचा काही बंदोबस्त होतो. ज्याची चूक त्यांस कळली म्हणजे तो दुसऱ्याने ती करीत नाही. याजकरिता लोकांचे मत प्रगट व्हावे, हा उत्तम मार्ग आहे. ज्यांस थोरपणा मिळतो त्यांस असे वाटत नाही की मी कमी शहाणा आहे. त्यांस सगळा शहाणा मी व अर्धे शहाणे बाकीचे सर्व जग आहे, असे वाटते. याजमुळे लोकांची स्तुती तो पसंत करतो. यास्तव वर्तमानपत्र असले म्हणजे तसे न होता मोठी सुधारणा होते.
 तात्पर्य, नशिबाचे कारण लोकच आहेत. व ही घालमेल त्याचे मूर्खपणामुळे होते. गहू आणि जोंधळे सारखे विकू लागले म्हणजे अर्थातच लोक नशिब म्हणू लागतात. आणि यापासून आळस उत्पन्न होतो व उमेद खचते. व कोणी योग्यता मिळविण्याची काळजी ठेवीत नाही. त्यांस असे वाटते की, मी व्यर्थ इतकी विद्या केली व शहाणपण शिकलो. येथे सकट घोडे बारा टक्के आहेत. त्यापेक्षा कोणी काही शिकू नये व विद्या करू नये, असे मनात येते. आणि मग यत्नाची अशी प्रवृत्ती पडते की, कोणाचे आर्जव, कोणाची गुलामगिरी करावी, म्हणजे काही पोटाची सोय होईल. वास्तविक थोरपणा मिळवावयाचा जो यत्न तो सोडून नीच कर्मास निर्वाहाकरिता लोक लागतात. याप्रमाणे हा सर्व अनर्थ लोकांचे अज्ञानामुळे किंवा राजाचे मूर्खपणाने होतो, याचा निश्चय होत नाही.
 तथापि आमचा अभिप्राय असा आहे की, याचे कारण लोकांचे अज्ञानच आहे. जर लोक शहाणे आहेत, तेच राज्यावर बसतात, हा निश्चय आहे. कसेही लोक मूर्ख असोत परंतु जे राज्यावर बसतात ते त्या वेड्यातील शहाणे असतात. पहिल्याने जो राज्य मिळवतो तो शहाणा व मग त्याचे वंशात मूर्ख निपजतात आणि राजवंशातील म्हणून लोक त्यांस मानितात; हा त्यांचा मूर्खपणा आहे.