पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७६ : शतपत्रे


नशिबावर हवाला

पत्र नंबर २४ : ३० जुलाई १८४८

 जे सोंगट्या व बुदबळे खेळतात त्यांस माहीत असेल की, सोंगट्याचे खेळात काही बुद्धी नाही. फाशास दान पडेल त्याप्रमाणे जय किंवा अपजय होतो. खेळणार मोठा बुद्धिमान असला तरी त्याचे बुद्धीचा काही उपयोग नाही. फाशाचे स्वाधीन तो असतो. तसे बुदबळाचे खेळात नाही. त्यात बुद्धीचा उपयोग आहे. जो शहाणा असेल, तो जिंकील, असा निश्चय करता येतो. सोंगट्यात कोणाचा निश्चय होत नाही.
 तद्वत् ज्या देशांत लोक शहाणे व राज्य शहाणपणाने चाललेले असते तेथे शहाणपणा वाढेल, असा निश्चय आहे. क्वचित न होईल तर ती गोष्ट खेरीज आहे. अस्तु. बहुधा नियम असा आहे की, जे लोक शहाणे आहेत ते उद्योगवादी असतात. व मूर्ख आहेत ते प्रारब्धवादी असतात. कारण उद्योगाने सिद्धी होते, हे ते जाणत नाहीत. हिंदू लोक जेव्हा तेव्हा नशीब व प्रारब्ध म्हणतात. आणि हे वास्तविक पाहिले तर खरेच आहे. कारण लोक मूर्ख असले म्हणजे तेथे शहाण्याने अशी उमेद धरू नये की, माझी अब्रू वाढेल व वेड्याने असे म्हणू नये की, मी नेहमी वेड्याचे योग्यतेनेच राहीन. एका पुरुषास दोन स्त्रिया असल्या म्हणजे त्या स्त्रिया आपल्या युक्तीने त्याचे अंतःकरण हरण करतात. परंतु तो जर वेडा असेल तर गुणी स्त्री असेल तिजवर प्रीती करीलच याचा नेम नाही. तो आपले अंतःकरण मूर्ख स्त्रीकडूनही वश करून घेईल, सांप्रत काळी हैदराबाद मुसलमानांची राजधानी आहे व पुणे ही ब्राह्मणांची राजधानी होती. परंतु दोहो ठिकाणी असे होते की, कोणाची चहा होईल आणि कोणाला लोक चांगले म्हणतील याचा नेम नाही. चांगल्या-वाईटाची परीक्षा नाही. ज्याचे प्रारब्ध उघडेल त्याची अब्रू एकदम वाढेल. तेव्हा कोण कोणास लुटतील व कोण कोणाची अब्रू घेतील, याचा भरवसा नाही. शहाणपणा व वेडेपणा याचा काही उपयोग नसे. फक्त नशिबावर हवाला.
 बाजीराव पुण्यात होता, त्यावेळी अशी अवस्था होती की, जे आज भाकऱ्या भाजीत होते, ते उद्या पालखीत बसले आणि आज पालखीत होते उद्या भिकेस लागले. तसेच ब्राह्मण व भट यांना दानधर्म करण्यास तो कर्णाचा अवतार होता. परंतु सत्पात्राचा विचार नाही. म्हणून ज्याचे नशीब उघडे त्यांस