पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८ : शतपत्रे

 ६. तळमळ :- पण लोकहितवादींचे हे लेखन समाजाविषयीच्या तळमळीतून निर्माण झालेले आहे हे मात्र आपण क्षणमात्रही विसरू शकत नाही. बालविवाह, विधवाविवाहबंदी, सती या दुष्ट रूढींनी गांजून गेलेल्या स्त्रीवर्गाविषयी त्यांना जी अपार सहानुभूती वाटते, वैधव्याच्या खाईत जन्म काढणाऱ्या दीन कन्यकांविषयी त्यांच्या चित्तात जे वात्सल्य ओसंडून येते ते याविषयीच्या प्रत्येक पत्रात व्यक्त होते. विधवांचे ते नरकसम जिणे पाहून ते अगदी आक्रोश करून सांगतात की, 'अहो, लोकांनो, तुम्ही आपल्या कन्यांचे वध करणारे आहेत. तुमची ही कृती खाटकासारखी आहे. आपल्या लहान, अर्भक बालाविषयी तुम्ही आपल्या मनात निष्ठुरपणा का आणता ? स्त्रियांना ज्ञान असते तर त्यांनी या शास्त्रीपंडितांच्या श्रीमुखात दिली असती. सती जावयास सांगणाऱ्यांच्या त्यांनी शेंड्याच उपटल्या असत्या. पूर्वी दैत्य व राक्षस होते ते असेच असतील!' स्त्रियांचे हाल पाहून त्यांना संताप येतो आणि मग ते शंकराचार्यांनाही भीत नाहीत की मनूचीही प्रतिष्ठा ठेवीत नाहीत. 'मनू जर ईश्वरांश असता तर स्त्रीचा नवरा तिच्या तरुणपणी मरू नये अशी व्यवस्था त्याने का केली नाही ?' असा प्रश्न ते विचारतात. व्यापार, उद्योगधंदे, कारागिरी हे सर्व नष्ट झाल्यामुळे या देशातील जनतेला जे दैन्य आले, ते पाहूनही त्यांचे हृदय तिळतिळ तुटते. येथे इंग्रजी राज्यच काही काळ राहावे, येथल्या लोकांचे राज्य लवकर होऊ नये, असे ते म्हणतात त्यामागे हीच भावना आहे. येथल्या राजांचे, सरदारांचे राज्य झाले की, ते पुन्हा गरीब रयतेचे काळ होतील. ठग, पेंढारी बाळगून तिला लुटतील हीच भीती त्यांना वाटे. इंग्रजांनी ही पेंढारशाही नष्ट केली होती. अंदाधुंदी मोडून काढली होती. म्हणून त्यांचे राज्य हितावह असे त्यांना वाटे. लोक शहाणे होऊन राज्यकारभार करण्यास लायक झाले म्हणजे तेच इंग्रजांस जावयास सांगतील व तेव्हा ते न गेले तर येथे क्रांती होईल असे लोकहितवादींनी बजाविले आहे. तेव्हा लोकांच्या, दीनदलितांच्या, गरीब रयतेच्या, हतभागी स्त्रियांच्या उन्नतीची चिंता हीच त्यांच्या 'शतपत्रां'च्या मागची प्रेरणा आहेत, याबद्दल शंका घेण्यास जागा नाही.
 ७. पहिले निबंधकार :- या सर्व दृष्टींनी पाहता मराठीतले पहिले निबंधकार हे मानाचे पद लोकहितवादींना द्यावे असेच कोणालाही वाटेल. आणि भौतिक कार्यकारणमीमांसा, तर्कशुद्ध प्रतिपादन, इतिहास, चरित्र व इतर शास्त्रे यांतून आधार प्रमाणे देण्याची वृत्ती, लोकशिक्षणास अवश्य तो आत्मविश्वास, सर्व गुण असल्यामुळे निबंधकार ही पदवी त्यांना द्यावयास पाहिजे यात शंका नाही; पण यात एक न्यून आहे आणि ते फार मोठे आहे. ते म्हणजे शतपत्रांतील