पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ५७

मोडून नवी करतील. हे काम समंजस पंडित आहेत त्यांचे आहे.' (पत्र क्र. ७). सुधारणा करण्याचे काम सरकारचे नव्हे, पंडितांचे आहे, ही जाणीव ठेवूनच लोकहितवादींनी 'शतपत्रे' लिहिली आहेत. या पत्रांत ते इतिहासाच्या आधारे बोलतात. तर्कबुद्धीला आवाहन करतात. लोकांच्या भावनांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हात जोडून विनवितात आणि फारच उद्वेग आला तर त्यांना शिव्याशापांची लाखोली वाहतात, पण सुधारणा दंडबलाने घडवून आणाव्या असे त्यांनी चुकूनसुद्धा कोठे म्हटलेले नाही. या देशात पार्लमेंट हवे, येथला कारभार लोकांच्या संमतीने चालावा व तो लोकांनीच जास्तीत जास्त अंगावर घ्यावा, अशी मते त्यांनी अन्यत्र मांडली आहेत; त्यांशी सुसंगत अशाच मतपरिवर्तनाच्या मार्गाचा त्यांनीही आपल्या लेखनात अवलंब केला आहे.
 ५. प्रखर, जहरी, कडवट भाषा :- असे लेखन करीत असताना अनेक ठिकाणी त्यांनी अत्यंत जहरी व प्रखर भाषा वापरली आहे हे खरे. ब्राह्मण म्हणजे शुद्ध बैल आहेत. शास्त्रीपंडित, भटभिक्षुक ही केवळ जनावरे आहेत, हिंदू लोक अगदी मूर्ख, भेकड आहेत, सरदार हे मोकाट सोडलेल्या पोळासारखे आहेत, असे दर पत्रात ते लिहितात. स्वकालीन ब्राह्मणांबद्दल लिहिताना किती खालच्या पातळीवर जाऊन लिहावे याचा त्यांना सुमारच राहात नाही. हे शास्त्री- पंडित सर्व मेल्यावाचून समाजाची सुधारणा होणार नाही, असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. ते पोटभरू आहेत, बहुरूपी सोंगाडी आहेत, चित्रकथी त्याहून बरे, हिंदू लोकांचे दुर्भाग्य म्हणून ते शास्त्रीपंडित यांचे पुढारी झाले, लोकांत भ्रांती उत्पन्न करावी एवढाच त्याचा उद्योग, या तर नित्याच्याच शिव्या आहेत. लोकहितवादींच्या विचारधनाची पातळी इतकी उंच आहे की, त्याचा आविष्कार करताना त्यांनी या तऱ्हेची भाषा वापरावयास नको होती, असे शतपत्रे वाचताना वारंवार मनात येते. काही ठिकाणी त्यांनी जे अगदी ग्राम्य शब्द वापरले आहेत ते तर अगदी निषेधार्ह वाटतात. पर समाजाच्या उन्नतीची त्यांना जी तळमळ वाटत होती, तीच त्याच्या बुडाशी आहे हे जाणून आपण हा दोष दृष्टीआड केला पाहिजे. केव्हा केव्हा असेही वाटते की असे मर्माघाती वाग्बाण लोकहितवादींनी सोडले ते अवश्यच होते. त्यावाचून अजगरासारखा घोर निद्रेत पडलेला हा समाज जागा झाला नसता; पण असा मर्माघात करणाऱ्या मनुष्याच्या लेखनाला जी प्रतिष्ठा प्राप्त व्हावयाची ती लोकहितवादींनी कृतीचा प्रसंग येताच जी माघार घेतली तिच्यामुळे झाली नाही. नाहीतर त्यांच्या याच लेखनाला एक भास्करदीप्ती येऊन समाजाने त्यांची प्रशंसा केली असती.