पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ५९

त्यांचे पुष्कळसे लेखन सूत्ररूपाचे, त्रुटित स्वरूपाचे आहे. विषयाचा विस्तार करावा, त्याचा सर्वागीण प्रपंच करावा, शाखापल्लवांनी, पुष्पफळांनी वृक्ष डवरतो तसा विचार डंवरून आणावा; तुलना, खंडन, मंडन, आक्षेपनिरसन, नाना प्रकारचे कोटिक्रम, भिन्न दृष्टिकोनांतून एकाच विचाराकडे पाहणे, तो पिंजून काढणे यांनी निबंध खरा सिद्ध होत असतो. तो प्रकार शतपत्रांत अगदी अपवादाने दिसतो. विधान करणे, सिद्धान्त मांडणे व फार तर स्पष्टीकरण करणे यापलीकडे लोकहितवादी जात नाहीत. विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, राजवाडे यांनी विषयाचा जो प्रपंच केलेल आहे तसा शतपत्रांत मुळीच दिसत नाही. म्हणून पहिले निबंधकार ही पदवी विष्णुशास्त्र्यांना देतात, लोकहितवादींना देत नाहीत. निबंधवाङ्मयाची सर्व बीजे त्यांच्या लेखनात आहेत, पण बीज रुजून त्यातील गुणांचा भव्य आविष्कार झाल्यावाचून त्याला वृक्ष म्हणत नाहीत.
 या आविष्कारात भाषेच्या वैभवालाही महत्त्वाचे स्थान आहे. शुद्ध, प्रौढ, पल्लेदार, प्रवाही, ओघवती भाषा हे निबंधाचे मोठे वैभव असते. लोकहितवादींच्या शतपत्रांत त्याची फार उणीव आहे आणि ती पदोपदी भासते. व्याकरणशुद्ध भाषा लिहिण्याचीसुद्धा ते कसोशी करीत नाहीत. कर्ता- कर्म- क्रियापदाचा मेळ घालण्याचीही ते फारशी काळजी घेत नाहीत. मग एका मागोमाग एक प्रौढ, पल्लेदार वाक्ये फेकून वाचकाला त्याच्या मोहिनीत पकडून आपल्या मताच्या पायाशी आणून उभे करणे हे त्यांना कसे जमणार ? व्याजोक्ती, वक्रोक्ती, उपहास, विनोद, व्यंजना, समर्पक उपमा, दृष्टांतादी अलंकार, यांनी प्रतिपादनाची शोभा वाढविण्याचे व त्यातील तर्काची पकड घट्ट करण्याचे सामर्थ्य लोकहितवादींच्या ठायी नाही. मनातला अर्थ सरासरी व्यक्त करावा एवढाच त्यांच्या शतपत्रांतील भाषेचा मगदूर आहे. त्यामुळे मराठीतील आद्य निबंधकार ही प्रतिष्ठा त्यांना दिली जात नाही. पण नवयुगप्रवर्तनाच्या कार्यात पुढील थोर तत्त्ववेत्त्यांचे हे जसे पूर्वगामी आहेत त्याचप्रमाणे निबंधरचनेच्या कार्यातही आहेत यात शंका मात्र नाही.