पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५४ : शतपत्रे

लोकहितवादींची लेखनशैली

 १. स्वतंत्र चिंतन करण्याचे सामर्थ्य :- लोकहितवादींची शतपत्रे सहज वरवर चाळली तरी भारतात कित्येक शतके दुर्मिळ असलेले स्वतंत्र चिंतन करण्याचे सामर्थ्य त्यांना लाभले होते, हे दिसून येते. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे हिंदू लोक शतकानुशतके एक प्रकारच्या बौद्धिक कैदेत होते. स्वातंत्र्य गेले, नाना देशचे लोक येथे राज्य करू लागले, व्यापार हातचा गेला, देश दरिद्री झाला, धर्माला ग्लानी आली, लक्षावधी लोक परधर्मात गेले तरी या काय घटना घडत आहेत, याचा अन्वयार्थ काय, यातून निष्पन्न काय होणार याविषयी विचार करण्याची व देशाच्या परिस्थितीचे निदान करण्याची ऐपतच येथे कोणाच्या बुद्धीला नव्हती. सद्दी, नशीब, परमेश्वरी क्षोभ यापलीकडे या अवनतीला काही कारणे असू शकतील हे कोणाच्या स्वप्नातही आले नाही. लोकहितवादींना परिस्थितीचे नव्या दृष्टीने आकलन करताआले याचे कारण म्हणजे त्यांनी उपासिलेली इंग्रजी विद्या हे होय. ती सरस्वती प्रसन्न होताच त्यांच्या बुद्धीवरच्या शृंखला तुटून पडल्या व प्रत्येक गोष्टीकडे भौतिक कार्यकारणाच्या दृष्टीने ते पाहू लागले आणि राजसत्ता ही देशाला घातक आहे, लोकांची सत्ता ही उपकारक आहे, आपला उत्कर्ष तिच्यामुळेच होईल, चातुर्वर्ण्य, जातिभेद यामागील तत्त्वे भ्रामक असून इतर जातींनी विद्या केल्यास त्यांची योग्यता ब्राह्मणांइतकीच ठरेल. विद्या ही सर्वांना हक्काने मिळाली पाहिजे, एकट्या ब्राह्मणांचीच ती मक्तेदारी असता कामा नये, स्त्रियांची प्रतिष्ठा संसारातल्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाइतकीच मानली पाहिजे, जे लोक स्त्रियांना शहाण्या करीत नाहीत त्यांचा अधःपात होतो इत्यादी अनेक क्रांतिकारक विचार त्यांच्या मनात येऊ लागले. आपल्या देशाचा अधःपात झाला तो शब्दप्रामाण्यामुळे, धर्माविषयीच्या विपरीत कल्पनांमुळे, जातीय विषमतेमुळे, उद्योगहीनतेमुळे अशी स्वतंत्र मीमांसा ते करू शकले, यातच त्यांचे स्वतंत्र विचार करण्याचे सामर्थ्य दिसून येते.
 २. निर्भय प्रतिपादन :- याच्या जोडीला हे स्वतंत्र विचार निर्भयपणे मांडण्याचे मनोधैर्य त्यांच्याजवळ होते, हे आपण आपले मोठे भाग्य मानले पाहिजे. आपल्या विचाराप्रमाणे कृती करण्याचे धैर्य त्यांच्या ठायी नव्हते. त्यामुळे त्यांचे नवे विचार अत्यंत हितकारक असूनही त्यांची उपेक्षा होऊन समाजाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे ते विचार लोकांपुढे मांडण्याचे धैर्यही त्यांनी दाखविले नसते तर एवढ्या क्रांतिकारक विचारधनाला समाज मुकला असता, पण तसे झाले