पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ५३

प्रतिबंध पूर्वीच्या लोकांनी काही कारणांनी घातला असेल, पण त्याचा हेतू न समजून पुढचे लोक त्यालाच धर्म समजू लागले. (५) पाचवे कारण म्हणजे कलियुग कल्पना. या कलियुगात समाजाचा नाशच व्हावयाचा. दुर्गुण प्रवृत्ती वाढावयाचीच. ईश्वरी संकेत तसाच आहे, असे भय शास्त्रकारांनी घातले व ते खरे मानून लोक हाय खाऊन बसले. (६) सहावे कारण म्हणजे प्रारब्धवाद किंवा दैववाद हे होय. परमेश्वर प्रत्येकाचे नशीब त्याच्या जन्माबरोबर लिहून ठेवतो. काही केले तरी ते फिरावयाचे नाही, अशीच लोकांची बुद्धी होऊन बसली. त्यामुळे उद्योगाचा उत्साह नष्ट झाला. (७) सातवे कारण असे की पूर्वीचे शास्त्रकार हे देव असल्यामुळे त्यांनी लिहिलेले प्रमाण मानले पाहिजे असा समज रूढ झाला. त्यामुळे नवीन मार्ग निघेनासा झाला. (८) धर्माविषयी विपरीत कल्पना हे आठवे कारण होय. चालरीत यालाच लोक धर्म समजू लागले. ईश्वरभक्ती हाही धर्म आणि पागोटे, अंगरखा, धोतर हाही धर्मच.
 या कारणामुळे हिंदू लोकांतील जागृती नष्ट झाली. आपल्या देशावर राज्य कोण करतो याचीही खबर त्यांस नसे. त्यामुळे मुसलमानांनी हा देश जिंकला आणि शास्त्री, पंडित, भट हे त्यांचीच खुशामत करून पोट भरू लागले. ब्राह्मण लोक घरात पुष्कळ सोवळे करतात. यवनांचा विटाळ मानतात, पण त्यांना राज्य करावयास त्यांनी हरकत केली नाही. उलट राज्य करणे, पराक्रम करणे हे काम मुसलमानांचेच होय, हिंदूंना ते जमणार नाही असे ते म्हणू लागले. घरात त्यांनी सोवळे केले पण देश सोवळा राखावयालाच ते विसरले. जो तो आपला स्वार्थ पाहू लागला. अशामुळे मुसलमानांचे राज्य चालले. त्यानंतर इंग्रज आले, पण ते कोठले कोण याचा अजूनही या लोकांस पत्ता नाही. अशा विपरीत बुद्धीमुळे या समाजाचा नाश झाला यात नवल काय? (पत्र क्र. ४५) या सारखेच विचार लोकहितवादींनी 'जुन्या समजुती' (पत्र क्र. ८) व 'स्वदेशप्रीती' (पत्र क्र. ६७) या पत्रात मांडले आहेत. यात हिंदूंच्या अवनतीची कारणे त्यांनी मांडली आहेत. आणि 'ज्ञान हाच पराक्रम' (पत्र क्र. ८५). 'नवीन ग्रंथांची आवश्यकता' (पत्र क्र. ९३), 'धर्म सुधारणा' (पत्र क्र. ६४), 'लग्नाविषयी विचार' (पत्र क्र. १५), 'राज्यसुधारणा' (पत्र क्र. २५), 'हिंदू लोकांनी काय करावे (पत्र क्र. ६०) या पत्रात ही अवनती थांबवून या समाजाची सुधारणा करण्याचे जे उपाय ते त्यांनी सांगितले आहेत.
 लोकहितवादींच्या विचारधनाचा प्रपंच येथवर केला. आता त्यांच्या लेखनशैलीचा विचार करून हे प्रदीर्घ विवेचन संपवू.