पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ५५

नाही. तो निर्भयपणा लोकहितवादींच्या ठायी होता त्यामुळेच वेद, पुराणे, स्मृती यांचे प्रामाण्य झुगारून द्या व स्वतः विचार करा असा उपदेश ते समाजाला करू शकले. बालविवाह, पुनर्विवाह, अस्पृश्यता, परदेशगमन असल्या विषयांवर त्यांनी रूढीच्या सर्वस्वी विरुद्ध असे विचार मांडले आहेत. 'शास्त्रार्थ हा लोकांच्या हिताच्या विरुद्ध असला तर शास्त्राज्ञा मानण्याची जरुरी नाही. शास्त्र म्हरजे लोकांस सुख होण्याकरिता रीत घातली आहे. त्यातून जर काही विपरीत असेल तर एकीकडे ठेवल्यास चिंता नाही, साक्षात ब्रह्मदेव विरुद्ध असला तरी डगमगू नये' असे अत्यंत नास्तिक वाटणारे विचार त्यांनी अनेक पत्रांतून मांडले आहेत. ब्राह्मणांची विद्या म्हणजे केवळ तोंडाची मजुरी आहे. ब्राह्मणांना दान देण्यापेक्षा चार मजूर लावून लाकडे तोडून घ्यावी, ते बरे. त्यांची विद्या ही अज्ञान अमर करण्यासाठीच निघालेली आहे, अशी मते शंभर वर्षांपूर्वी मांडणे फार कठीण होते. पण लोकहितवादी ती मांडताना कचरले नाहीत. शास्त्रीपंडितांची निंदा, त्यांच्यावरची प्रखर टीका एक वेळ खपून गेली असती, पण त्याबरोबरच महाराची योग्यता असेल तर त्यालादेखील नमस्कार करावा, कैकाडी, कातोडी यांनाही लोकसभेत स्थान द्यावे, असे सांगितल्यामुळे त्या काळी सवर्ण समाजाचा किती संताप झाला असेल याची आपल्याला सहज कल्पना येईल. आज कायद्याने अस्पृश्यता नष्ट झालेली असतानाही अस्पृश्यांची कोठलीच तक्रार निर्मूलन झालेली नाही इतका त्या रूढीचा प्रभाव आहे. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी तो याच्या शतपट सहज असेल. पण लोकहितवादींनी त्याला भीक घातली नाही व साहसीपणाने आपले त्या विषयावरचे विचार मांडले हे आपले मोठे सुदैव होय.
 ३. गाढ व्यासंग :- स्वतंत्र चिंतन करण्याचे सामर्थ्य व त्या चिंतनातून निघणारे निष्कर्ष समाजापुढे मांडण्याचे नीतिधैर्य लोकहितवादींना प्राप्त झाले ते त्यांच्या गाढ व्यासंगामुळेच होय. अशा तऱ्हेची विद्येची अभिरुची हीही त्या काळी आपल्या समाजात दुर्मिळ होती. विष्णुशास्त्री यांनीसुद्धा म्हटले आहे की, जुन्या काळच्या पंडितांस विद्येची अभिरुची म्हणजे काय याची कल्पनाच नव्हती. पण लोकहितवादी इंग्रजी पंडित होते. जगातील घडामोडींविषयीची, त्यांच्या मागल्या कारणपरंपरेविषयीची, तत्त्वज्ञानाविषयीची तीव्र जिज्ञासा लोकहितवादींच्या ठायी होती. इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, संस्कृत विद्या इत्यादी विषयांचा त्यांनी फार सखोल अभ्यास केला होता. कोणत्याही विषयावर मत देण्यापूर्वी ते त्याचा सांगोपांग अभ्यास करीत असत. आणि इतिहास, अर्थशास्त्रादी शास्त्रे, थोरांची चरित्रे यांच्या आधारेच स्वमताची मांडणी करीत असत. इंग्रज पूर्व काळी रानटी