पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५२ : शतपत्रे

 इंग्रजी सत्ताधाऱ्यांची लुटारू वृत्ती, येथला व्यापार, येथली कारखानदारी नष्ट करून हा देश स्मशानवत करून टाकण्याचे सरकारी धोरण व खेड्यांतही जनतेची इंग्रजांनी चालविलेली पिळवणूक, ही जनतेच्या ध्यानी आणून देऊन तिच्या ठायी भयंकर असंतोष निर्माण करावयाचा हे धोरण अवलंबूनच विष्णुशास्त्री, टिळक यांच्या राष्ट्रीय पक्षाने स्वातंत्र्याच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोविली होती. लोकहितवादी आपल्या उत्तरवयात का होईना कृतीने नाही पण निदान विचाराने तरी याच राष्ट्रीय वृत्तीशी येऊन ठेपले होते हे त्यांच्या या प्रबंधावरून दिसून येते. (हा प्रबंध त्यांनी १८८३ साली लिहिला. लोकमान्य टिळकांनी हे विचार सांगण्यास १८८१ सालीच प्रारंभ केला होता.)

सारार्थ

 लोकहितवादी यांच्या समाजजीवनाच्या भिन्न अंगांविषयीच्या मतांचा येथवर परामर्श घेतला. त्यांच्या सर्व तत्त्वज्ञानाचा सारार्थ आता सांगावयाचा, पण तो त्यांनीच एका पत्रात मांडवा आहे. तेव्हा तोच येथे देणे सयुक्तिक होईल. 'हिंदुस्थानच्या पराधीनतेची कारणे' या पत्रात त्यांनी त्याविषयीची आपली मते मांडली आहेत. आणि त्याला 'हिंदुनाशाष्टक' असे नाव दिले आहे.
 हिंदुनाशाष्टक :- त्यांच्या मते पांडवांच्या काळी हिंदू लोक फार ऐश्वर्यास चढले होते. अनेक विद्या, कला त्यांनी हस्तगत केल्या होत्या. त्या समाजात व्यास, वाल्मीकी, कपिल, नारद, अर्जुन यांसारखे थोर पुरुष उदयास आले होते. त्या काळी संपूर्ण जगतात ऐश्वर्यवान असा देश एवढाच होता. पण पुढल्या काळात या ऐश्वर्यामुळेच लोक आळशी झाले आणि त्यांनी विद्येची उपासना सोडून दिली. त्यामुळे संस्कृत भाषाही मागे पडली. प्राकृत भाषा उदयास आल्या. (१) पण या प्राकृत भाषांत संस्कृतसारखे ग्रंथ नाहीत, आणि हेच हिंदू लोकांच्या नाशाचे पाहिले कारण होय. (२) दुसरे कारण असे की कालेकरून लोकांत असा समज रूढ झाला की, ज्यांनी संस्कृत ग्रंथ लिहिले ते देव होते आणि तसे ग्रंथ लिहिणे हे मनुष्याचे काम नव्हे. (३) तिसरे कारण असे की ब्राह्मणत्व हे विद्येवर न ठरता कुळावर ठरू लागले. त्यामुळे ब्राह्मणांच्या कुळात जन्मला त्याला, विद्या केली नाही तर नीचत्व येईल, हे भय राहिले नाही. जन्म ब्राह्मणकुळात झाला तेव्हा विद्या शिकलो न शिकलो तरी सारखेच असे त्याला वाटू लागले. इतर जातीचे लोक कुळामुळेच मला पूज्य मानून माझ्या पायाचे तीर्थ घेतील. (४) चवथे कारण म्हणजे परदेशगमनाचा निषेध. देशातच राहिले पाहिजे, बाह्यदेशी जाऊ नये असा