पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ५१

तिच्यावर अगदी प्रखर टीका केली आहे. 'अदालतीचे कर लुटारूसारखे आहेत', 'या देशातील लक्ष्मी वाढण्याचा यत्न सरकार करीत नाही', 'भाड्याचा उंट, त्याजवर लादता लादता नाळी पडल्या तरी कोणी मनास आणीत नाही. एकतर्फी काम चालते', 'दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा कारभार पाहतो, तसे इंग्रज सरकार या देशाचे राज्य चालवीत आहे.' अशा तऱ्हेचे कडवट विचार या पुस्तकात अनेक ठिकाणी आढळतात. "इंग्रजांनी राज्य बलात्काराने घेतले असे क्षणभर मान्य केले तरी व्यापार तर बलात्काराने घेतला नाही ना ? मग तो येथल्या लोकांना ताब्यात घेण्यास काय हरकत आहे ?" असे एका पत्रात त्यांनी म्हटले आहे. पण व्यापार बलात्काराने घेतला नाही, हे मत भ्रामक आहे हे त्यांच्याच पुढे ध्यानात आले. 'येथील उदीम वाढवावे व येथे खाणी काढाव्या ते एकीकडे राहून जकातीचा कायदा ठरविण्याचे वेळी होपसाहेबांनी जे भाषण केले त्यावरून तेथील उद्योग कमी व्हावा व सुताचे कारखान्यावर कर घालून त्यास जेर करावे, उंच प्रतीचा कापूस येऊ देऊ नये. बारीक कापड येथे करतील त्यास अडचणी घालाव्या, असेच सरकारी धोरण सरकारने अवलंबिले आहे असे दिसते.' असे त्यांनी वरील पुस्तकात म्हटले आहे व 'हे धोरण सर्वथैव अयोग्य आहे. परिणामी विषासारखे आहे. लोभामुळे अशी बुद्धी धरण्यात काही फायदा नाही.' असा सरकारला इशाराही दिला आहे.
 ९. ग्रामीण जनता :- 'ग्रामरचना' ह्या निबंधात लोकहितवादींच्या मूलगामी दृष्टीचा वारंवार प्रत्यय येतो. हिंदुस्थान हा खरा खेड्यांतच आहे व त्याचे दुःखही खेड्यात आहे, हे त्यांनी जाणले होते. गरीब, कष्टाळू जनतेच्या जीवनाशी ते समरस होऊ शकत होते, हे या निबंधावरून सहज ध्यानात येते.
 "रयतेला दुसरा धंदा व दुसऱ्या कोणाचे रक्षण नसल्यामुळे सुनेला ज्याप्रमाणे कशीही सासू द्राष्ट व खाष्ट असली तरी तिच्या हाताखालीच नांदावे लागते, तद्वत् सरकारने कसेही वागविले व तरवारीच्या धारेवर धरले तरी खाली मान घालून सरकारचा अधिकार व कबजा रयतेला मानावा लागतो, पण रयत नादान व सर्वांशी परावलंबी झाली म्हणून तिच्या सौख्याकडे इतके दुर्लक्ष करणे किंवा तिच्या ओरडण्याकडे इतके उदासीनतेने पाहणे चांगले नाही. रयत जी आज गांजल्यासारखी व त्रस्त झाली आहे याचे कारण आहे की, सारे, धारे व करपट्टया यांचे ओझे रयतेला उचलेना इतके जड झाले असल्यामुळे ती त्या ओझ्याखालीच गारद होत आहे." या उद्गारावरून जनतेचे दु:ख त्यांच्या किती जिव्हारी लागले होते हे कळून येईल.