पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८ : शतपत्रे

'आपले देशाचे हित करावे हा मुख्य धर्म युरोपात समजतात.' (पत्र क्र. १४).
 ६. भारतात राजा विष्णूचा अवतार :- राजनिष्ठा ही जशी एक शक्ती तशीच लोकशाही ही दुसरी शक्ती होय. 'हिंदू लोक मूर्ख आहेत. राज्यसुधारण म्हणजे काय हे त्यांस कळत नाही. कारण राजसत्तेवाचून दुसरी सत्ता त्यास माहीत नाही. एशिया खंडातील देशात बहुधा एक राजा असून स्वैर अंमल करतो. त्याची रयत त्याचे गुलामाप्रमाणे व तिचा नाश-नफा करण्याविषयी संपूर्ण मुखत्यारी राजास असते. युरोपात जर काही अपाय किंवा वाईट वर्तणूक राजाकडून किंवा त्याचे प्रधानाकडून होईल तर लोक त्यास बडतर्फ करतात. ही गोष्ट आपले इकडील लोकांस फार अशक्य व चमत्कारिक वाटेल. कारण की इकडील लोकांस राजा म्हणजे विष्णूचा अवतार व प्रधान म्हणजे ब्रह्मदेव वाटतो. त्यांनी अन्याय केला तरी म्हणतात की, राजाने सर्वस्व लुटले तर तेथे दुःख करून काय करावयाचे ? तेव्हा या लोकांस सुधारणा माहीत नाही. मी जाणतो की लोक मूर्ख आहेत, त्यांस विचार करण्यास शक्ती नाही. तत्राप मला एक उपाय सुचला आहे तो मी लिहून प्रगट करतो.' (पत्रे क्र. १४ व २५). अशी सर्व प्रस्तावना करून लोकहितवादींनी आपली पार्लमेंट किंवा लोकसभा याबद्दलची कल्पना मांडली आहे, ती अशी :
 ७. लोकांची सभा :- हल्ली येथे कंपनीसरकारचे राज्य आहे. त्यात लोकांस काही अखत्यार नाही. इंग्रजांचे स्वदेशी राज्यात तसे नाही. तेथील लोकांस राज्यात हात घालण्याचा व कायदे करण्याचा अधिकार आहे. तेथील राजा जडजाचे नाझराप्रमाणे आहे. लोकांची सभा म्हणजे पार्लमेंट हे कायदे फर्मावतात व राजा त्याबरहुकूम वहिवाट करतो. येणे करून लोकांस पाहिजे तसे राज्य चालते. एक राजा स्व-इच्छेने राज्य करतो त्यापेक्षा ही युक्ती खरी आहे व याप्रमाणे हिंदुस्थानात राज्य चालेल तर फार चांगले होईल. जे सूज्ञ लोक असतील, त्यास मोठे जाग्यावर व अधिकारावर नेमता येईल, असे इकडे राज्य असावे.
 १८३४ साली ईस्ट इंडिया कंपनीला इंग्रज सरकारने हिंदुस्थानात २० वर्षे राज्य करण्याची सनद दिली होती. तिची मुदत १८५४ साली भरणार होती. त्या वेळी विलायतेतील राणीसाहेबांस आमचे देशात पार्लमेंट ठेवावे असा अर्ज करावा, असे या पत्रात लोकहितवादींनी सुचविले होते. १८३४ साली काही इंग्लिश लोकांनी इंग्लंडच्या पद्धतीने हिंदुस्थानात राज्य चालविले, म्हणजे लोकांना स्वायत्तता द्यावी अशी सूचना केली होती. पण कंपनी सरकारने ते नाकारले. कारण कंपनीच्या मते हिंदू लोक स्वायत्त कारभाराला अगदी नालायक होते. तसे केल्यास हिंदुस्थानात बखेडा होईल. सर्वत्र बेबंद होईल, असे कंपनीने सांगितले.