पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३७

लोकहितवादींच्या मते सुमारे दोनशे वर्षे लागतील. वरील पत्रात त्यांनी दोनशे-चारशे वर्षं म्हटले आहे. अन्यत्र एके ठिकाणी ५०० वर्षं म्हटले आहे. पण या वरील पत्रातच शेवटी समारोप करताना यास दोनशे वर्षे तरी पाहिजे असे म्हटले आहे. त्यांचे मत असे की, आपल्या लोकांच्या पायातील शृंखला तुटल्या की ते शहाणे होतील, त्यांना राज्यकारभाराचे कर्तृत्व लाभेल. व्यापारात, नव्या विद्येत ते निपुण होतील व मग आपणच इंग्रजांस सांगतील की, आता तुम्ही आपले देशास जावे. आता आम्हास तुमचे गुरुत्व नको. तुम्ही पाहिजे तर व्यापारापुरते इकडे येत जा. आमचे प्रजेचे आम्ही रक्षण करतो तसे तुमचेही करू. परंतु तुमचे वर्चस्व नको. याप्रमाणे या देशाची गती होईल आणि नवीन राज्यस्थिती चांगले रीतीची होईल. पण यास दोनशे वर्षे तरी पाहिजेत. (पत्र क्र. ५४). 'आपले लोक इंग्रजांस आपण जावे म्हणून सांगतील.' असे या पत्रात म्हटले आहे. दुसऱ्या एका पत्रात 'हिंदू लोकांचा मूर्खपणा जाईल तेव्हा ईश्वर इंग्रजांस या देशातून जाण्याची आज्ञा करील.' असे म्हटले आहे. तेव्हा 'ईश्वरी योजना' या कल्पनेचा पगडा त्यांच्या मनावर बराच होता असे दिसते.
 ५. देश ही मातोश्री :- इंग्रजांच्या राज्यात, त्यांच्या शिक्षेखाली आपण राहिलो म्हणजे आपले अज्ञान, आपला मूर्खपणा सर्व नाहीसा होऊन आपण आपला राज्यकारभार करण्यास समर्थ होऊ, असे अनेक वार सांगून इंग्रजांचे हाताखाली आपण कोणते शिक्षण घ्यावयाचे, त्याचे स्वरूपही लोकहितवादींनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रनिष्ठा व लोकशाही या पाश्चात्त्य देशातील महाशक्ती होत. त्यांच्या बळावरच ती राष्ट्रे उन्नत झाली, समर्थ झाली, हे इतिहास तज्ज्ञांस माहीत आहेच. लोकहितवादींनी नेमक्या याच शक्तीची उपासना करण्यास आपल्या लोकांना सांगितले आहे. नव्या परिस्थितीचे त्यांना किती अचूक आकलन झाले होते ते यावरून दिसून येते. 'स्वदेशप्रीती' या पत्रात ते म्हणतात, 'जसे आपण मातोश्रींस वंद्य मानतो व तिच्या पोटी जे आले ते सर्व बंधुप्रीतीने वागतात, तद्वत् या जमिनीवर जे आपण आहोत ते सर्व एकमेकांचे बंधू आहोत व हा देश आपणा सर्वांची मातोश्री आहे. याजकरिता कोणी सुखी व द्रव्यवान असतील, त्यांनी बहुत लोक उपाशी मरतात व दरिद्री आहेत त्यांचे रक्षणाचा प्रयत्न करावा. आपण सर्वांनी आज दोन हजार वर्षेपर्यंत यथेच्छ सुखाने झोप घेतली व काही उद्योग केला नाही म्हणून आता तरी जागृत होऊन काय आहे ते पाहू व बुद्धीचा उपयोग करू.' 'स्वदेशाचे हितास झटावे,' हीच लोकहितवादींच्या मते मुख्य धर्मसुधारणा आहे. (पत्र क्र. ६७). युरोप याच सुधारणेमुळे उन्नत झाला हे सांगताना ते म्हणतात,