पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३९

लोकहितवादी म्हणतात की, या गोष्टीला आता १८ वर्षे झाली. (हे पत्र १८४८ सालचे आहे.) व सनद पुन्हा देण्यास अजून सहा वर्षे अवधी आहे. इतक्या अवधीत कित्येक लोक शहाणे होतील व आपला कारभार करण्यास लायक होतील म्हणून राणीसाहेबांकडे अर्ज करण्यास काहीच हरकत नाही.
 ८. पार्लमेंटचे स्वरूप :- लोकहितवादी म्हणतात, 'त्या अर्जात लिहावे की, हल्ली राज्यपद्धती आहे तीपासून आमचा फायदा नाही व आमचे राज्यासंबंधी हक्क चालत नाहीत व हिंदू लोक जसे तसे इंग्रज लोक मनुष्ये आहेत. याकरता इन्साफ बरोबर होण्याकरिता इंग्रज व नेटिव यांत सांप्रत जो भेद आहे तो मोडून एकसारखे होण्याकरिता हिंदुस्थानचे देशात पार्लमेंट ठेवावी व ही सभा मुंबईस भरवावी. या सभेत दर शहरातून एक व दर जिल्हयातून दोन अशी माणसे बसवावी. हे लोक सर्व जातीतील सारखे असावे. त्यात भट, गृहस्थ, शास्त्री, परभू, कुळंबी, मुसलमान, इंग्रज इत्यादी जे शहाणे असतील ते नेमावे व त्यांनी राज्य चालवावे. म्हणजे लोकांचा फार फायदा होईल. यास्तव लोकांचे हित पाहणारे आहेत त्यांनी हा बेत केला पाहिजे.' (पत्र क्र. २५).
 लोकहितवादींनी त्यांच्या मनातील लोकसभेचे जे रूप वर्णिले ते थेट आजच्या लोकसभेसारखे आहे हे पाहून मन विस्मित होते. लोकांनी आपले मुखत्यार नेमावयाचे ! ते सर्व जातींतून निवडायचे, सर्व धर्माचे लोकांना अधिकार द्यावयाचा व त्यांनी राज्य चालवावयाचे ! ते सर्व लोक शहाणे असले पाहिजेत ही जी लोकहितवादींनी अट घातली आहे तेवढीच फक्त आज नाही.
 ९. या पद्धतीचे फायदे :- 'या पद्धतीने राज्य चालले म्हणजे दारिद्रय वगैरे बोभाट लोक सांगतात. हे त्वरित दूर होतील आणि इंग्रज लोक इकडील लोकांस मूर्ख समजतात, ते मत मोडेल आणि राज्याची उत्तम सुधारणा होऊन एके राजाचे अंमलात सुख काय व लोकसत्तात्मक राज्यात सुख काय, हे सहज दृष्टोत्पत्तीस येईल आणि मग शिंद्यांचे किंवा हैद्राबादचे राज्य चांगले की काय ते त्वरित ध्यानात येऊन राज्य चालविण्याचे रीतीची लोकांना माहितगारी होईल व एका राजाचे ताब्यात राहून त्याचा जुलूम सोसावयाची हिंदू लोकांस खोड लागली आहे ती ते विसरून जातील. त्याचप्रमाणे राज्य करण्यास गरीब व मातबर, नीच जातीचे व उच्च जातीचे लोक समान मानावे हे सर्वांस कळू लागेल. मात्र अशा सभेस जातीवर निवड होऊ नये. जे फार विद्वान व चांगले चालीचे लोक आहेत तेच नेमले पाहिजेत. मग त्यांची जात कोणतीही असो.' (पत्र क्र. २५)
 १०. क्रान्ती (रिवोल्यूशन) :- देशप्रीती, लोकसभा यांच्याप्रमाणेच