पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३६ : शतपत्रे

५०,००० पेंढारी लुटावयाचे कामावर ठेवले होते. त्यांचे निर्मूळ इंग्रजांनी केले. जे राज्य करतात तेच लुटारू लोकांस बाळगतात, हे कधी कोणी ऐकले होते काय ? जे राजे चोरांचे रक्षण करतात आणि लुटारू लोकांस बाळगतात, त्यांचे वर्णन काय करावे ! किती काळ ब्राह्मणी राज्य चालते तरी सती बंद होती ना. पेंढार मोडते ना, व बालहत्या बुडती ना. त्या वेळी कोणी स्त्रियांस जाळून टाकीत, कोणी जिवंत पुरत, कोणी गळ्यात दगड बांधून बुडवीत. हे सर्व मूर्खपण कधी तरी हिंदू लोकांच्याने बंद करवले असते काय ? नाही.' (पत्र क्र. ३८) 'तेव्हा इंग्रजांचा अंमल हा हंगाम बरा आहे. पेशव्याचे राज्यात कोणी काही सुख भोगिले. परंतु विचार केला नाही, खाल्ले मात्र, शेवटी दुसऱ्याने तोंडात मारून नेले, तेव्हा डोळे उघडले. तस्मात् इंग्रजांचे अंमलाचा परिणाम चांगला, पण लोक शहाणे होण्यास खुशी नाहीत. तरी ईश्वर जबरीने करवितो आहे. तुम्ही नको म्हणाल तरी तो ऐकणार नाही. ही त्याची दया मानावी. ईश्वर दयाळू आहे.' (पत्र क्र. १२). पूर्वीची राज्ये अशी लुटारू होती पण आता आमच्या लोकांत सुधारणा झाली आहे. असे कोणी म्हणेल तर त्यांना लोकहितवादी सांगतात, 'अजूनही राज्यकर्त्यांचे गुण आमच्या ठायी नाहीत. स्वदेशीय राज्ये हल्ली आहेत. त्यात काय गर्दी आहे ती पाहावी म्हणजे बाजीरावाचे मूर्तिमंत राज्य डोळ्यांपुढे उभे राहते. मामलेदार मक्ते चढ करून रयत लुटतात. जमा येते ती रांडा, गोंधळी, भट, आर्जवी, ढोंगी वगैरे खाऊन जातात. हेच बाजीरावाने केले व अद्याप मराठी राज्यात हेच आहे. उजाडले किंवा मावळले, याची त्यास ख़बर नसते. फक्त जनावराप्रमाणे खाणे, निजणे एवढ्यापुरती काळजी.' (पत्र क्र. ४६). अशी सर्व तुलना करून लोकहितवादी आपल्या लोकांस विनवून सांगतात की, 'हिंदू लोकांनी याचा विचार पाहावा. या साक्षात् शहाणे लोकांची गाठ पडून हिंदू लोकांच्या वाईट चाली बहुत सुटल्या व आणखीही किती एक सुटतील आणि त्यांची मने शुद्ध होऊन त्यास राज्यकारभार, व्यापारधंदा कसा करावा हे ज्ञान येईल. देशसुधारणा क्षणात होत नाही. तीस पुष्कळ विलंब लागतो. लहान मुलास हुशार होण्यास दहावीस वर्षं लागतात; मग देश चांगला होण्यास अर्थातच दोनशे-चारशे वर्षं लागतील. तापर्यंत या लोकांस दुःख आहे. परंतु त्यास उपाय नाही. जशी शाळेमध्ये मुलांनी शिक्षा घेतली पाहिजे, तद्वत् हे आहे. याचे उत्तम फळ पुढे येईल.' (पत्र क्र. ५४) .
 ४. राज्यसुधारणेस २०० वर्षे लागतील :- इंग्रजांचे हाताखाली शिक्षण घेतल्यावर आपण शहाणे होणार, पण यास किती काल लागेल ?