पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३५

इलाज नव्हता. सती जाणे, पोरे मारणे, जगन्नाथाचा रथ उरावर घेणे, इत्यादी अघोरी व लज्जास्पद चालींमुळे ईश्वराचा क्षोभ अत्यंत जहाला. तेव्हा दुष्ट लोकांस ताळ्यावर आणण्यास ईश्वराने इंग्रज सरकारची योजना केली.' (पत्र क्र. ४६) 'मुख्य आमचे बोलण्याचा येथून प्रारंभ आहे की, ज्या गोष्टी ईश्वर घडवून आणतो त्या वाईटाकरिता नसतात. मनुष्याचे ज्ञान थोडे म्हणून त्या वाईट, असा प्रथम भास होतो. तरी शेवटी त्यापासून मोठा उपयोग असतो. हिंदुस्थानचे लोक हे फार मूर्ख व धर्मकर्म सोडून अनाचारास प्रवर्तले. यास्तव ईश्वराने या देशात इंग्रजांची प्रेरणा केली आहे.' (पत्र क्र. ५४)
 ३. पूर्वीच्या राज्याशी तुलना (इंग्रजी राज्यापासून लाभ) :- त्या काळी पुष्कळ शास्त्री- पंडित त्याप्रमाणे ब्राह्मण व मराठा सरदार आपले राज्य गेले व इंग्रजांचे राज्य आले, म्हणून हळहळत असत, संतापत असत. परमेश्वराने अवतार घेऊन पूर्वी रावणास, दुर्योधनस, जरासंधास जसे मारिले तसेच आता व्हावे, अशी इच्छा व्यक्त करीत असत. आपले राज्य पुन्हा आले तर आपण सुखी होऊ असे त्यांस वाटत असे. त्यांचा हा भ्रम नाहीसा व्हावा म्हणून लोकहितवादींनी पूर्वीच्या राज्यांचे वर्णन करून तेथे कशी अंदाधुंदी होती, पेंढारशाही होती, तशी राज्ये पुन्हा झाली, तर काय अनर्थ घडतील, ते अनेक पत्रांतून तपशिलाने सांगितले आहे व परोपरीने इंग्रजांचे राज्यच या देशात आज कसे हितावह आहे, ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 'इंग्रज सरकार या देशात आहेत याविषयी, लोक उघड नाही तरी मनातले मनात कुरकूर पुष्कळ करतात, व मुख्यत्वेकरून भट, पंडित, शास्त्री हे तर फार हैराण आहेत; परंतु माझे मत असे आहे की, या देशास हेच सरकार ठीक आहे. मागले सरकार वाईट व मूर्ख होते. जिकडे तिकडे जुलूम होता. त्याने देशाची सुधारणा व विद्यावृद्धी काहीच केली नाही. फक्त भट, वैदिक व मूर्ख लोकांचे पोषण करून रक्षिले. तसेच पेंढारी, रामोशी, ठक, डाकवदे इत्यादी लोकांस रक्षिले आणि देशात लूट, सांड पुष्कळ करीत असत. हल्ली आमचे लोकांस राज्य मिळाले तर तीच अवस्था करतील.' (पत्र क्र. ९४). 'जेव्हा मराठे लोक शिंदे, होळकर, परमुलखात (म्हणजे त्यांचे समजुतीप्रमाणे परमुलख- परंतु वास्तविक पाहिले तर मुलूख एकच.) गेले तेव्हा त्यांची वर्तणूक कशी होती ? ते किती गावं जाळीत होते ? शहरे व सावकार किती लुटीत होते ? या गोष्टीचे स्मरण ठेविले तर इंग्रज बरे आहेत हे लक्षात येईल. इथले लोक सुधारून मूर्खपणाचे शृंखलेपासून मुक्त व्हावे, याजकरिता त्यांचा उद्योग बहुत चालला आहे. शिंदे, होळकर लक्ष्मीचे अंधकारात होते तेव्हा त्यांनी