पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४ : शतपत्रे

हिशेब वर दिलाच आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच तर या समाजाचा नाश झाला. त्यांचे नेतृत्व हे मोठे दुर्भाग्य ठरले ! मग या समाजाचे आता नेतृत्व कोणी करावयाचे ?
 १. इंग्रज उद्धारकर्ते :- हे नेतृत्व इंग्रजांनी करावयाचे, तेच या देशाचा उद्धार करण्यास समर्थ आहेत असे लोकहितवादींचे या प्रश्नास उत्तर आहे. इंग्रज लोक हे हिंदू लोकांपेक्षा शतपट शहाणे आहेत, कर्तबगार आहेत, प्रामाणिक आहेत, राज्यकर्त्यांत जे गुण असावयास हवेत ते त्यांचे ठायी आहेत. पूर्वी पेशवाईत अगदी मोठा शहाणा म्हणजे नाना फडणीस. पण आता इंग्रजांमध्ये नानापेक्षा सहस्रशः शहाणे असे अनेक लोक आहेत. त्यांच्यातील कारभारी यांची बुद्धी विशाल, मसलत खोल, अनेक देशींचे वृत्तान्त त्यास माहीत व त्यांचे आपसांत एकमत. इंग्रजांत एक मेला की दुसरा तयार असतो. हा क्रम मराठी राज्यात नव्हता. तेव्हा आपली सध्याची दुरवस्था नष्ट करून आपली उन्नती साधण्याचे कार्य पार पाडण्यास इंग्रज हेच लायक आहेत, असे लोकहितवादींचे निश्चित मत होते. (पत्र. क्र. ३८, ४१)
 २. ईश्वरी योजना :- आपला उद्धार इंग्रजांच्या हातून होईल असे लोकहितवादींचे नुसते मत होते असे नाही. तशी ईश्वरी योजनाच आहे अशी त्यांची श्रद्धा होती. ते म्हणतात, 'ईश्वर सर्वज्ञ आहे. तो असा की जसे जसे योजावयाचे तसे तो योजतो. त्याने क्षुधा केली आहे तर अन्नही तो योजतो. म्हणून एक राज्य जाते व दुसरे होते. अशा मोठाल्या घालमेली होतात त्या भगवंताचे प्रेरणेशिवाय घडत नाहीत. तेव्हा हिंदू लोकांचे मूळचे राज्य मुसलमानांनी घेतले व त्याजकडे चारपाचशे वर्षे राहून आता सर्व भरतखंड इंग्रजांचे अंमलात गेले. या गोष्टी ईश्वराने चांगलेपणाकरिताच योजिल्या आहेत असे मला वाटते. पूर्वी हिंदू लोक शहाणे होते. आता त्यांचे शहाणपण नाहीसे झाले आहे. ते शहाणपण हिंदू लोकांस पुन्हा प्राप्त व्हावे एतदर्थ ईश्वराने हा मुलूख इंग्रजांचे ताब्यात दिला आहे. कारण सांप्रत इंग्रज लोक हिंदूंपेक्षा शंभरपट शहाणे झाले आहेत.' (पत्र क्र. १२) 'इंग्लिश राज्याची आवश्यकता' या पत्रात पुन्हा हाच विचार त्यांनी मांडला आहे. 'इंग्रज लोक याणी इकडे राज्य संपादन केले याचे कारण काय ? याचा विचार करता असे दिसते की, हिंदू लोकांमध्ये मूर्खपणा फार वाढला, तो दूर होण्याकरिताच गुरू दूर देशातून इकडे ईश्वराने पाठविले आहेत. हिंदू लोकांस आता जागृती आली, पृथ्वीवर कोठे काय आहे हे कळू लागले. हे सर्व इंग्रजांमुळे झाले. ईश्वराने ही शहाणपणानेच योजना केली आहे. लोकांची झोप जाण्यास दुसरा