पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३३

देता आले नाही. याला कारण तेच- ब्रिटिशांचे राज्य येथे दीर्घकाल टिकले यालाही हेच कारण. लोकहितवादींनी शंभर वर्षांपूर्वी हे जाणले यातच त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. समाजाच्या उन्नति- अवनतीचे सर्व रहस्यच त्यांनी या एका वाक्यात सांगितले आहे.
 सतीच्या चालीविषयी लिहिताना लोकहितवादींनी हेच लिहिले आहे. आमच्या बायका अंधारात. त्यांस जसे सांगितले तसे वर्ततात. याजमुळे सती जाण्याचा पाठ पडला. जर बायका शहाण्या असत्या व त्यांस विद्या वगैरे शिकविण्याची चाल असती तर ज्यांनी त्यास प्रथम सती जाण्यास सांगितले त्यांच्या त्यांनी शेंड्या उपटून टाकल्या असत्या. अजूनही जर स्त्रियांस विद्या शिकविल्या तर त्या आपला पुनर्विवाह करतील आणि शास्त्री वगैरे जे आडवे येतील त्यांस पुसतील की, पुरुषांनी पाहिजे तितकी लग्ने करावी मग स्त्रीने नवरा मेल्यावरही दुसरा नवरा का करू नये ? आणि आपणच शास्त्रार्थ देऊन चालू करतील.' (पत्र क्र. ५५)
 लोकहितवादींची विद्येच्या सामर्थ्यावर अशी नितान्त श्रद्धा असल्यामुळेच स्त्रियांचे दु:ख निवारण्यासाठी त्यांनी हा उपाय आग्रहाने आपल्या लोकांना सांगितला आहे. 'स्त्रियांस विद्या शिकविण्याचा लोकांनी जरूर विचार करावा. स्त्रिया वाईट, असे पुष्कळ लोक म्हणतात. कोणी म्हणतात, 'स्त्रीबुद्धी प्रलयं गत:' परंतु यांसारखे शतमूर्ख पृथ्वीत नाहीत. जसे पुरुष तशाच बायका स्वभावाने व बुद्धीने आहेत. जे लोक स्त्रियांना वाईट म्हणतात त्यांनी पक्के समजावे की ही मूर्खपणाची समजूत आहे.'

५. इंग्रज आणि राज्यसुधारणा


 हिंदूच्या धर्मशास्त्रात, समाजरचनेत, त्यांच्या विद्येमध्ये आणि त्यांच्या जीवनाच्या इतर अंगोपांगांमध्ये कोणते दोष आहेत, वैगुण्ये आहेत ते सांगून लोकहितवादींनी त्यावर काही उपाययोजनाही सांगितली. शब्दप्रामाण्य जाऊन येथे बुद्धिप्रामाण्य आले पाहिजे, ब्राह्मणांचे व पुराणांचे वर्चस्व नष्ट झाले पाहिजे, धर्मकल्पना बदलल्या पाहिजेत, जातीजातींत व स्त्रीपुरुषांत समता प्रस्थापिली पाहिजे, स्त्रियांना व सर्व जातींना विद्या सुलभ करून दिली पाहिजे, इत्यादी अनेक उपाय त्यांनी सांगितले. पण त्या काळी एक मोठा प्रश्न होता. हे सर्व कोणी घडवून आणावयाचे? धर्मसुधारणा झाली पाहिजे. समाजसुधारणा झाली पाहिजे. हिंदू समाजात आमूलाग्र परिवर्तन झाले पाहिजे. सगळे खरे, पण हे कोणी करवयाचे ? समाजाचे नेतृत्व ब्राह्मणांकडे व सरदार लोकांकडे. त्यांच्या कर्तृत्वाचा व विद्येचा