पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२ : शतपत्रे

'मंडळ स्थापणे' हाच उपाय सांगितला व तो अंमलात आणण्याचा काहीसा प्रयत्नही केला.
 १०. स्त्रीशिक्षण हा उपाय :- स्त्रियांवरील आपत्तीचे निवारण करण्यासाठी रूढींच्या जाचातून त्यांची मुक्तता करण्यासाठी पुरुषांच्या दयाबुद्धीला आवाहन, शास्त्रीपंडितांनीची निर्भर्त्सना, सुधारकांचे मंडळ स्थापणे, इत्यादी उपाय लोकहितवादींनी सांगितले, पण त्यांच्या मते खरा उपाय म्हणजे शिक्षण देऊन स्त्रियांना शहाण्या करणे हा होय. हा उपाय जितका प्रभावी होईल तितका दुसरा कोणताच होणार नाही. ते म्हणतात, 'नवरा मरणे ही प्रारब्धाची गोष्ट आहे. व तत्संबंधी जुलूम फक्त हिंदू लोकांच्या अज्ञानी व गरीब बायकांनीच सोसला आहे. जेव्हा या स्त्रिया विद्वान होतील तेव्हा या पंडितास चरणसंपुष्टांनी पूजा अर्पण करतील यात संशय नाही. परंतु याच कारणास्तव ब्राह्मण लोक स्त्रियांस शहाण्या करण्यास असे प्रतिकूल आहेत. जुलमाने शास्त्र जेथे चालू आहे तेथे जरूरच आहे की, बायका जनावरांप्रमाणे नीच अवस्थेत राखल्या पाहिजेत. स्त्रिया सुशिक्षित होतील तेव्हा आपला अधिकार स्थापतील आणि संसारसुखास हानी करणारे पंडितांपासून असा तहनामाच करून घेतील. परंतु सांप्रत बायका अगदी जनावरे पडल्या म्हणून पंडितांस संधी सापडली आहे.' (पत्र क्र. १०५) दुसऱ्या एका पत्रात आपद्ग्रस्त स्त्रियांच्या आप्तजनांस आवाहन करून ते म्हणतात, 'तुम्ही शहाणे, विचार करणारे असून एवढा तुमच्या घरातील अनर्थ तुमच्याने दूर कसा होत नाही. तुम्ही आपल्या स्त्रिया व कन्या मूर्खपणाचे अवस्थेत जन्मापासून बाळगल्या आहेत. म्हणूनच हा जुलूम त्यांजवर चालतो व त्या सोसतात. जर त्यास थोडे ज्ञान असते, तर त्यांनी त्याचा विचार काढून जे पुनर्विवाह करू नये म्हणतात त्यांचे श्रीमुखात दिली असती, यात शंका नाही. परंतु अज्ञान व भोळसटपणामुळेच सर्वत्र जुलूम चालतो असा नेम आहे. त्याचप्रमाणे हे झाले आहेत. जर आपल्या देशात दहा स्त्रिया विद्वान असल्या आणि त्या जर विधवा झाल्या असत्या तर त्यांनी आपला पुनर्विवाह करण्याचे ठरविले असते. आणि दुष्ट ब्राम्हणांचे तंत्रात त्या कधी राहिल्या नसत्या, यात संशय नाही.' (पत्र क्र. १०)
 या पत्रातील 'अज्ञान व भोळसटपणामुळे सर्वत्र जुलूम चालतो असा नेम आहे.' हे वाक्य रत्नाच्या मोलाचे आहे. भारताच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासाचे हे सूत्र आहे. येथे अस्पृश्यांवर, शूद्रांवर, स्त्रियांवर जुलूम झाला त्याला कारण हेच अज्ञान! या भूमीवर सारखी आक्रमणे झाली. त्यांना आपल्याला तोंड