Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४०४ : शतपत्रे

१५) तैत्तिरीय संहितेत युगकल्पना आहे, परंतु त्या ठिकाणी कृत, त्रेता व द्वापर ही तीनच नावे आढळतात. ब्राह्मण ग्रंथात मात्र चारही युगांची नावे आली आहेत.
 याची वर्षसंख्या चार लक्ष बत्तीस हजार वर्षांची असून मगा नक्षत्री सप्तर्षी आले म्हणजे कलियुगास प्रारंभ होतो. हे युग सर्वांत खालच्या प्रतीचे मानतात व त्यात माणसे भ्रष्ट होतात, वाटेल तसे आचार करतात आणि परिणामी यातना भोगतात अशी समजूत आहे.
 कलियुगकल्पनेचा पगडा मराठी माणसांवर शिवछत्रपतींच्या अगोदरच्या काळात फारच होता. नमुन्यासाठी 'महिकावतीच्या बखरी'तील पुढील अवतरण पाहा- "कलियुगांत असा (हिंदू राज्ये नष्ट होण्याचा) प्रकार होणार अशी भाक लक्ष्मीनारायणाने दिली होती. ती शके १२७०त खरी ठरली. हरिहर गुप्त झाले, ऋषी बदरिकाश्रमी गेले, वसिष्ठही गेले. सूर्यवंशी, चंद्रवंशी क्षत्रिय यांची शस्त्रविद्या लुप्त झाली."

पृष्ठ ३५६: (इंग्रज राज्य बळकावतील) असा जर विचार पाहिला असता
 लोकहितवादी म्हणतात तसा विचार मराठ्यांच्या मनात आला नव्हता असे नाही. इंग्रज हे वरकड साहूकार नव्हत' यांसारखे मार्मिक उद्गार बखरवजा ग्रंथातून व पत्रांतून आढळतात; त्यावरून हे उघड होते, पण मराठ्यांनी विचार केला तसा आचार केला नाही हेही तितकेच सत्य आहे.

पृष्ठ ३६५: विदुरनीति
 धृतराष्ट्राचा भाऊ व महामंत्री विदुर याने महाभारतातील उद्योगपर्वात राजा धृतराष्ट्राला उपदेश केला आहे (अ. ३३-४०). त्याने माणसाच्या गुणदोषांची चर्चा करून आदर्श व्यक्तित्व कसे असते हे स्पष्ट केले आहे.

पृष्ठ ३७३: (१) भालेराई (२) होळकरी गर्दी (३) पेंढारी अशा गोष्टी पुनरपि होतील
 (१) भालेराई- संभाजीच्या वधानंतर मुसलमानांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपली ठाणी बसविली. राजाराम मुसलमानांशी मुकाबला करण्याच्या प्रयत्नात होताच. पण मधल्या काळात रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञेवरून मराठ्यांनी मुसलमानांची ठाणी उठविण्याचे प्रयत्न स्वतंत्रपणे केले. रूपाजी व बाबाजी भालेराव या नावाचे दोन सरदार या कामी मराठ्यांचे