Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे: ३९७

म्हणतात. हे म्हणत असताना लोकहितवादींनी पाठशाळेचा (आणि 'कल्याणोन्नायक मंडळी'चाही) अधिक्षेप 'पुरंदरचे बंड' या शब्दात केला आहे. 'पुरंदरचे बंड' असा शब्दप्रयोग करण्याचे कारण ठामपणे सांगता येण्याइतकी स्पष्टता येथे नाही. तथापि दूरान्वयाने अर्थ लावता येईल, तो असा- माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत इ. स. १७६४ मध्ये पुरंदर किल्ल्यावर कोळ्यांनी एक छोटेसे बंड केले. वस्तुतः कोळी हे तेथील रखवालदार; पण त्यांनीच हे विपरीत कृत्य केले. या कृत्यासारखेच कृत्य पुण्यातील 'कल्याणोन्नायक मंडळी' चे सभासद व 'पाठशाळे'चे अभिमानी हे करीत आहेत. हे विद्वान, पंडित यांनी खऱ्या विद्येचे रक्षण करावयाचे, तर हे जुन्या, गतार्थ विद्येची कड घेतात, ग्रामण्यादिकांत शक्ती खर्च करतात; म्हणजे एक प्रकारे कोळ्यांच्या बंडासारखेच हे विद्याविरोधी बंड होय, असे लोकहितवादींना येथे सुचवावयाचे असावे.

४. स्त्री जीवन

पृष्ठ २५५: (१) विश्वामित्राने नवी सृष्टी केली; (२) अगस्तीने समुद्र प्राशन केला; (३) दुर्वासाचे शापाने विष्णूने दहा जन्म धारण केले व (४) भृगूने लक्ष्मीनारायणास लाथ मारली.
 (१) विश्वामित्राने त्रिशंकूला सदेह स्वर्गी चढविण्यासाठी प्रतिसृष्टी निर्माण केली अशी कथा आहे.
 (२) पूर्वी राक्षस समुद्रात लपून राहून देवांना त्रास देत असत. तो चुकविण्यासाठी इंद्राने अग्नि आणि वायू यांना समुद्र शोषण्याची केलेली आज्ञा त्यांनी न मानल्यामुळे त्यांस इंद्रशापामुळे मृत्युलोकी जन्म घ्यावा लागला. तो त्यांनी अगस्तीच्या रूपाने घेतला; आणि समुद्राचे शोषण करून देवांना राक्षसांच्या त्रासातून मुक्त केले.
 (३) विष्णूने जे दशावतार घेतले ते येथे अभिप्रेत आहेत.
 (४) श्रीवत्स हा श्राद्धदेवाचा पुत्र. त्याचा विवाह ठरला, त्यावेळी चातुर्मास असल्यामुळे मुहूर्त मिळेना. श्रीवत्साला विवाह लवकर उरकावयाचा असल्यामुळे तो क्षीरसागराकडे गेला व त्याने झोपलेल्या विष्णूच्या छातीवर लाथ मारून त्यास जागे केले व आपला विवाह उरकला, अशी भागवतात कथा आहे.