Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३९६ : शतपत्रे

लुटालूट केली. शस्त्रागार, अंबाऱ्या, सोने, रूपे, जवाहिर, कापड सारे त्याने लुटून नेले. लूट करताना त्याने लोकांवर अनन्वित अत्याचार केले. 'पुणे-वर्णन' कर्ते ना. वि. जोशी लिहितात (पृ. ६६), "त्या वेळेस होळकर हे नाव ऐकण्यापेक्षा यमाजीपंत याचे नाव ऐकण्यास लोकांस बरे वाटे." (होळकर प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी व 'पुणे-वर्णना'तील लुटीच्या व अत्याचारांच्या तपशीलवार वर्णनासाठी डॉ. रा. शं. वाळिंबे यांचा 'महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना' हा ग्रंथ पाहा. पृ. २०-२३).

पृष्ठ २४४: वेदान्ती आहेत त्यांस, असे समजत नाही
 उपनिषदात सांगितलेले तत्त्वज्ञान ते वेदान्त. पण शंकराचार्यप्रणीत अद्वैतासच सामान्यतः वेदान्त म्हणून संबोधिले जाते. जीव व ब्रह्म एक आहे; जग हा केवळ भास आहे असे अद्वैत वेदान्त सांगतो. लोकहितवादींस हे म्हणणे मुळीच मान्य नाही. ते जगाचा विचार आध्यात्मिक पातळीवरून न करता ऐहिक भूमिकेतून करतात. त्यामुळेच परब्रह्माचा विचार करणारे त्यांना मूर्ख वाटतात आणि इहलोकातील गांजलेल्या जीवास ज्ञान सुख देणारे त्यांना खरे वेदान्ती वाटतात.

पृष्ठ २४५: दक्षणा ग्रंथकर्त्यास द्यावी
 सेनापती खंडेराव दाभाडे यांनी तळेगाव येथे विद्वानांना दक्षिणा द्यावयास सुरुवात केली. ५ लक्ष रुपये दरवर्षी वाटले जात. इ. स. १७३० मध्ये खंडेराव दाभाडे याचा मुलगा त्रिंबकजी याचा बाजीराव बल्लाळ पेशवे याने धोरणीपणाने पराभव केला. नंतर दक्षिणा पुण्यात वाटण्यास प्रारंभ झाला. एलफिन्स्टनने दक्षिणा वाटण्याचा क्रम पुढेही चालू ठेवला, पण कालांतराने दक्षिणा देण्याचे सरकारने हळूहळू बंद केले. १८४९ साली निम्मी दक्षिणारक्कम मराठी ग्रंथांना उत्तेजन देण्यासाठी सरकारने 'दक्षिणा प्राइझ कमिटी' निर्माण केली. असे करावे ही मागणी सरकारकडे काही एतद्देशीयांनीच केली होती, असे लोकहितवादी सांगतात.

पृष्ठ २४६: म्हणजे एक पुरंदरचे बंड मोडले
 १८२१ साली 'पुणे-संस्कृत- पाठशाळा' स्थापन झाली. १८२३ साली ती बंद करावी अशी सूचना कंपनीच्या डायरेक्टरांनी केली; पण ती एलफिन्स्टनने फेटाळली. पाठशाळेत प्रचलित असलेल्या संस्कृत- शिक्षणात लोकहितवादींस अनर्थाचे मूळ दिसत असल्यामुळे पाठशाळेचा विध्वंस प्रथम करावा असे ते