Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३९५

करून घेण्यास त्या काळी सुमारे ४०० रुपये खर्च येई." (पेशवेकालीन महाराष्ट्र- वा. कृ. भावे; पृ. १०५) पण एकाच वेळी अनेक प्रती तयार करणाऱ्या छापखान्याची कल्पना कोणास सुचली नाही किंवा सुचली असली तरी कायम स्वरूपात मूर्त करण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. शिवछत्रपतींनी छापखाना काढण्याचा प्रयत्न केला असे म्हणतात; पण तो यशस्वी झालेला दिसत नाही. नाना फडणविसाने लाकडाच्या ठोकळ्यावर अक्षणे कोरून गीता छापण्यास सुरूवात केली असे उल्लेख मिळतात; पण नानाच्या प्रयत्नासही विशेष फळ आलेले दिसत नाही. ख्रिस्ती मिशनरी हिंदुस्थानात आल्यावर (१९ व्या शतकाच्या प्रारंभी) मुद्रणविद्या प्रसार पावू लागली. तोपर्यंत तिचा अभावच होता. राज्य गेले त्याचे मूळ यात आहे या लोकहितवादींच्या म्हणण्यात फार खोल अर्थ आहे.

पृष्ठ २२२: पुण्यात वकील होता
 पुण्याच्या दरबारात इंग्रजांचे वकील (मॅलेट, इंचबर्ड...) थोरल्या माधवरावाच्या कारकीर्दीपासून राहू लागले. मराठ्यांना 'वकील आहे.' एवढीच खबर असे. वकिलाचे धोरण, त्याच्या राजकारणाचे मर्म जाण्याची कुवत त्यांच्यात नव्हती.

पृष्ठ २३६: बाजीरावाने गंगाधरशास्त्री याजला मारले
 गंगाधर कृष्ण पटवर्धन हे मेणवलीचे राहणारे. पेशव्यांच्या वाड्यात कर्नाटक प्रकरणाच्या दप्तरात ते कारकून म्हणून काम करीत. पेशवे व गायकवाड यांच्यामधील बेबनाव मिटविण्याच्या कामी त्यांनी नेमणूक झाली होती. त्या वेळी दुसऱ्या बाजीरावाने त्यांचा खून आपला कारभारी त्रिंबकजी डेंगळे याच्याकरवी पंढरपूर येथे करविला असा लोकापवाद आहे. (१४ जुलै १८१५) (या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी 'मराठे व इंग्रज' हे न. चिं. केळकर यांचे पुस्तक पाहावे. पृ. १०४- १०६)

पृष्ठ २४०: पूर्वी होळकरांनी... पुणे शहर लुटून लोकांस मारिले
 अमृतराव (दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ) याच्या अमलाखाली पुणे असताना १८०२ साली यशवंतराव होळकराने पुण्यावर धाड घातली. बाजीरावाने त्याच्या भावास- विठोजीस क्रूरपणे मारले. त्याचा सूड उगविण्यासाठी यशवंतराव नोव्हेंबर महिन्यात पुण्यावर चाल करून आला. त्याने पुण्यात मन मानेल तशी