पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३१

चांगली व्यवस्था होईल तो नियम करावा. जे पूर्वी शास्त्र लिहिले तेच सर्व काळ चालले पाहिजे असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. जसे पूर्वीचे वैद्यक होते; परंतु त्यात आता जी सुधारणा झाली असेल ती घेतली पाहिजे. तसेच ज्योतिष, तसेच धर्मशास्त्र यात फेरफार केले पाहिजेत व त्यातील नियम सुधारले पाहिजेत. जे सुखास आडवे येईल ते दूर करावे. लग्नाचा नियम हा धर्म नव्हे, ही रीत आहे. लोकांमध्ये व्यवस्था होण्याकरिता ती केली. ती जर वाईट असेल तर दुसरे नियम करण्यास चिंता नाही. ज्या काळी ऋषींनी लिहिले त्या काळी त्यांचे सर्व नियम लोकांचे सुखवृद्धीकरता व व्यवस्थेकरता लिहिले. त्यांनी लोकांचे घात व्हावे, असे जाणून लिहिले नाही. परंतु पुनर्विवाहाचा दुष्ट परिणाम सर्वांस समजला आहे तरी अंधपरंपरेस सर्व भितात इतकेच. यास्तव जितकी त्वरा होईल तितकी अशा समयी करावी, कारण एक घटका उशीर झाला तर हजारे स्त्रियांस समुद्रात लोटून दिल्याचे पातक डोकीवर बसते.'
 ९. सुधारणेसाठी कटाव करावा :- विधवांच्या पुनर्विवाहाची प्रथा रूढ करण्यास उपाय सांगताना लोकहितवादी सांगतात की, 'या कामी एकट्यादुकट्याने खर्ची पडू नये. या सुधारणेला संमती देणाऱ्या लोकांचा एक गट करावा म्हणजे ही गोष्ट सुलभ होईल. त्यांच्या मते असे होते की, प्रथम सभा घेतली तर चारपाचशे संमती सहज पडतील आणि इतके लोक एकत्र आल्यावर त्यास प्रतिबंध करणार कोण ? येऊन जाऊन शास्त्रीपंडितांच्या बहिष्काराचे भय. पण हजार दोन हजार लोक एकत्र झाले की ती एक प्रजाच होईल. एवढ्यांना जातीबाहेर टाकले तरी काय चिंता आहे ? ब्राह्मणांनी इंग्रजांना जातीबाहेर ठेवले तर त्यांचे काय कमी झाले ?' यावरून लोकहितवादी म्हणतात की, 'सुधारणा सामुदायिकरीत्या केली की शास्त्रीपंडितांच्या बहिष्काराचे भय नाही आणि अशा रीतीने, धिटाईने एका मोठ्या गटाने पायंडा पाडला की ज्या हिंदू गृहस्थाला सुधारणा करण्याची इच्छा होईल तो त्यांच्यात येईल आणि मग हळूहळू सर्व हिंदू लोक पुन्हा एकत्र येतील.' (पत्र क्र. १६). पुढे 'पुनर्विवाह' या पत्रात ब्राह्मणांनी एक कटाव करावा असे लोकहितवादींनी म्हटले आहे. त्याचा अर्थ हाच. 'परंतु मला असे वाटते की, सर्व ब्राह्मण जातीने निश्चय करून पुनर्विवाह चालू करण्याचा शिरस्ता घालावा व पंडितांचे ऐकू नये. दोन-चारशे लोकांनी असा एक कटाव केला म्हणजे पंडित उगीच राहतील किंवा सामील होतील. परंतु त्यांच्याने द्वेष होणार नाही व काही उपद्रव होणार नाही. पंडितांस सामर्थ्यहीन करण्यास एक कटाव मात्र पाहिजे.' (पत्र क्र. ९९). चाळीस वर्षांनी टिळकांनी सुधारणा करण्यास