Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३९० : शतपत्रे

असा वर त्याने मागून घेतला... पुढे एकदा हा गुहेत झोपलेला असताना कृष्णाने आपला शेला याच्या अंगावर घातला. मागून तेथे आलेल्या दुष्ट कालयवनाने शेल्यामुळे मुचकुंदासच कृष्ण समजून त्याला लाथ मारली, तेव्हा मुचकुंद जागा झाला आणि वराप्रमाणे कालयवन जळून गेला.

पृष्ठ १४२: क्रिस्तियन धर्म युरोपखंडात वृद्धिंगत झाला
 पॅलेस्टाइन हे ख्रिश्चन धर्माचे मूलस्थान. तेथे रोमन लोकांचे वर्चस्व होते. त्या वेळी रोमन साम्राज्यात ख्रिश्चनांचा अतिशय छळ झाला. नीरो (इ. स. ६४), डॉमिशियन (इ. स. ८५), टॅजन आणि सम्राटांच्या अमलात व पुढे इ. स. २५० नंतर तर ख्रिस्त्यांचा अनन्वित छळ झाला. कॉन्स्टन्टाइन (इ. स. ३१३) या सम्राटाने ख्रिश्चन धर्माकडे औदार्याने पाहिले व त्यावरील नियंत्रणे काढून टाकली. त्यानंतर इ. स. ३७९- ३९५ या काळात थियोडोशियसच्या कारकीर्दीत ख्रिश्चन धर्म हा राजधर्म झाला; आणि मग तो झपाट्याने युरोपात व इतर ठिकाणी प्रसार पावला.

पृष्ठ १४३: इराण देशांत जरस्ताचा अग्निपूजेचा धर्म
 झरतुष्ट्र (सुमारे इ. स. पूर्वी ९ वे शतक) या पारशी धर्मसंस्थापकाचा जन्म मीडियाचे पश्चिमेस असलेल्या अट्रोपेटन या गावी झाला. याने पर्शियन लोकांना नव्या धर्मांची तत्त्वे सांगितली. सत् व असत् यांच्या संघर्षात शेवट सत्याचा विजय होऊन कल्याण होते; तेव्हा अहिरिमनचे अनुयायित्व न पत्करता अहुरमज्दाचे अनुयायित्व पत्करावे. सद्विचार, सत्शब्द, सत्कृत्य यांच्या परिपालनाने साधुत्व येते असा त्यांच्या तत्त्वप्रतिपादनाचा आशय होता. हिंदुधर्मातील काही तत्त्वांशी ही तत्त्वे जुळती आहेत. झरतुष्ट्राचे हे प्रतिपादन 'अवेस्ता' नावाच्या धर्मग्रंथात वाचावयास मिळते.

पृष्ठ १६०: कोणी म्हणतात शिव अधिक
 भक्तिपंथातील दोन संप्रदाय म्हणजे शैव संप्रदाय व वैष्णव संप्रदाय हे होत. शैव संप्रदाय आपल्या तत्त्वज्ञानात 'शिवा'स अग्रस्थान देतो, तर वैष्णव संप्रदाय विष्णूस मुख्य दैवत मानतो. एका काळी या दोन संप्रदायांत दैवतविरोधावरून रणे माजली. पुढे शंकराचार्यांनी पंचायतनपूजा सुरू करून दोन पंथांचा समन्वय साधण्याचा व त्यातील वैर कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.