Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३८९

औदार्य बाणले; आणि मग त्यांनी सुधारणाविषयक कार्यक्रम तातडीने हाती घेतला, 'स्टुडन्टस लिटररी असोसिएशन' सारख्या संस्थेतून निबंध वाचून स्त्रीशिक्षणादी सुधारणांचा आग्रहाने पुरस्कार केला. पारशी लोकांनी औद्योगिक सुधारणांसही स्थान दिले व व्यापारात हिरिरीने भाग घेऊन कर्तृत्व दाखविले. बयरामजी कर्सेटजी, नवरोजी फर्दुनजी, दादाभाई नवरोजी, नसरवानजी वाडिया, फ्रामजी कावसजी, जमशेटजी जिजीभाई आदी व्यक्तीचें कार्य या दृष्टीने लक्षात घेण्याजोगे आहे. (अधिक माहितीसाठी पु. बा. कुलकर्णीलिखित 'नाना शंकरशेट यांचे चरित्र' पाहावे.)

पृष्ठ १२८: कल्याणोन्नायक मंडळी
 'पुणे पाठशाळे' चे प्रमुख मोरशास्त्री साठे यांनी मंडळीची स्थापना केली. जनमानसावर चांगले संस्कार करण्याचा व लोकमतास नवे वळण लावण्याचा हेतु या स्थापनेमागे होता, परंतु तो फारसा सफल झाला असे त्या मंडळीच्या कार्यावरून वाटत नाही, लोकहितवादींच्या दृष्टीने तर मंडळीचे कार्य अनर्थकारक ठरलेले दिसते. पृष्ठ.... वरही 'कल्याणोन्नायक मंडळी' चा उल्लेख लोकहितवादींनी पुन्हा केला आहे. त्यावरूनही हेच दिसून येते
 (लोकहितवादींचे म्हणणे बरोबर नसल्याचे ग. त्र्यं. माडखोलकरांनी सूचित केले आहे. पाहा- 'चिपळूणकर- काल आणि कर्तृत्व' पृ. ५१-५५)

२. हिंदूंचे धार्मिक जीवन

पृष्ठ १३६: तो पंथ अलीकडे... पुणे इ. ठिकाणी बहुत चालू
 शिवाची शक्ती हीस आराध्य दैवत मानणारा पंथ तो शाक्तपंथ. जातिबंधने त्यास अमान्य. मद्य-मांस-मैथुनादी 'पंच मकार' या पंथात फार बोकाळलेले. १८४८च्या सुमारास पुण्यामध्ये हा पंथ फार जोरात होता असे तत्कालीन 'ज्ञानप्रकाशा 'तील उल्लेखावरून दिसते.

पृष्ठ १४२: पुराणप्रसिद्ध मुचकुन्दाप्रमाणे निद्रा करतो
 मुचकुन्द हा मांधाता राजाचा सर्वांत धाकटा मुलगा. तो फार प्रतापी होता. त्याने अवधी पृथ्वी पादाक्रान्त केली. दैत्यांशी लढणाऱ्या देवांना साह्य केले. तेव्हा देवांनी याला वर मागण्यास सांगितले. 'आपल्या निद्रेचा जो भंग करील तो जळून खाक व्हावा व त्या क्षणी आपल्याला विष्णूचे दर्शन व्हावे'