पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३० : शतपत्रे

याप्रमाणे खाटकाचे घरी मेंढराचीही दुर्दशा होत नाही. तो त्यास एक वेळ सुरी लावतो त्या वेळेस मात्र काय दुःख होत असेल तेवढेच !' (पत्र क्र. ९०)
 ६. वपन :- ही एवढीच आपत्ती नाही. याच्या भरीला वपन ही घोर आपत्ती आहे. ती मनात येताच लोकहितवादींचा तर तोल अगदी सुटतो. ते म्हणतात, 'प्रत्येक ब्राह्मणाच्या घरात विधवा नाही असे नाही. आणि कित्येकांच्या कन्या अशा लहानपणी विधवा झालेल्या की त्यास नवरा म्हणजे काय ते ठाऊकदेखील नाही. आणि त्यांचे पुन्हा लग्न नाही; हा केवढा जुलूम आहे ! यामुळे किती पोरी व्यभिचारी बनतात, पोरे मारतात ! हजारे जीव मरतात आणि दुःखी होतात. म्हणून मुलगी विधवा झाली की तिला विद्रूप करून टाकावयाची. जरी तारुण्य व लावण्य असेल तरी बळेच वेडेविदरे स्वरूप करून बसतात आणि शास्त्रीपंडित म्हणतात की, त्या बाईने पूर्वजन्मी वाईट तपश्चर्या केली म्हणून हे फळ प्राप्त झाले. ईश्वराने उन्हात उभी केली. हे पूर्वजन्माचे दुष्कृत्याचे फळ. म्हणून आता ते करा आणि आमचे पोट जाळा. म्हणजे सुकृत होऊन सात जन्म वैधव्य प्राप्त होणार नाही. असे म्हणून गरीब व भोळे जिवास फसवितात.' (पत्र क्र. १०४).
 ७. मनू जर ईश्वर असता :- विधवाविवाहाच्या निषेधाचे समर्थन करताना शास्त्रीपंडित म्हणतात, की असे शास्त्र आहे व मनूने असे स्मृतीत लिहिले आहे. त्यावर लोकहितवादी विचारतात की, 'मनू हा जर ईश्वरांश होता तर त्याने अशीही सत्ता पृथ्वीवर का प्रकट केली नाही की जर आपण शास्त्र केले तर असेही करु की कोणे एकेही ब्राह्मण स्त्रीचा नवरा मरणार नाही. प्रथम स्त्री मरावी, नंतर नवरा मरावा. असा क्रम जर पृथ्वीवर घातला असता तर मी म्हटले असते की, मनू हा ईश्वर होता व ब्राह्मण हे ठीक करतात. पण स्त्रियांवरील या आपत्तीचा बंदोबस्त मनूच्याने होत नाही तर त्याचे शास्त्र फिरविण्यास काय चिंता आहे ?' (पत्र क्र. १५). मनूप्रमाणेच लोकहितवादींनी शंकराचार्यांचीही याच पत्रात संभावना केली आहे. 'वंशवृद्धी व्हावयाची तिचा नाश व किती एक जिवांस दुःख, याचे कारण कोणाचे लक्षात न येऊन शंकराचार्यांस मोठे धर्माचे अध्यक्ष म्हणवितात.'
 ८. धर्मपरिवर्तन अवश्य :- भावार्थ असा की ज्यांना स्त्रियांच्या आपत्तीचा विचार करावयाचा आहे, त्यांनी शास्त्राची गुलामगिरी प्रथम नष्ट केली पाहिजे व आपल्या बुद्धीने विचार केला पाहिजे. 'पुनर्विवाहाची चाल पाडणे हे शास्त्राविरुद्ध म्हणतात. परंतु लोकांचे हिताकरिता करावे, हेच माझे म्हणणे आहे.