Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८२ : शतपत्रे

लौकिकाचे धोरण आहे. जरी कोणास असे वाटले की, भटास देणे निरुपयोगी आहे. तरी त्याचा उपाय नाही. ही लौकिकाची गोष्ट आहे. जर भटास दिले, तर लौकिक होतो. 'धर्मात्मा धर्मात्मा' म्हणून भट उठवितात; नाही तर निंदा करतात. गाईकवाडास म्हणतात की, तेरा हजार रुपये इंग्रजी शाळेस दिले, ते भटास देते, तर बरे होते. धर्म करावयाचा टाकून शाळेस पैसा कशास दिला? असे म्हणतात. तात्पर्य, शाळा घालणे, विद्या वाढविणे हे त्यांस धर्मकृत्य वाटत नाही. टोणपे भटास लौकिकाकरिता देतात, त्यांस धर्म म्हणतात.
 याजमुळे असे सिद्ध होते की, ब्राह्मण आपले पोट भरावयाचे मात्र उद्योगात असतात. काही उपयोगी काम न करिता व विद्या न करिता फक्त शास्त्रीबुवा, मोठे थोर, म्हणून बसल्या जाग्यावर जो देईल तो धर्म, असे समजतात. शाळा घालणे हा धर्म त्यांस वाटतच नाही. हा केवढा चमत्कार आहे? प्रथम त्यांस असे वाटते की, शिकावयाचे काही राहिलेच नाही. संहिता पाठ म्हणतो, आता विद्या शिकावयाची राहिली काय? असे वाटून त्याशिवाय विद्या शिकविण्यास कोणी पैसा देईल, तर त्यांस दुःख वाटते. आणि व्यर्थ पैसा टाकला असे वाटते.
 परंतु या मूर्खास असे कळत नाही की, पाठ म्हणणे व अक्षरे तीन तीन वेळा उलटसुलट म्हणणे ही विद्या नव्हे, हा मूर्खपणा आहे. यास्तव असा मूर्खपणा वाढविणारे, त्यांस द्रव्य देऊन पाठ म्हणणारे मात्र पढविले, असे होईल. नवीन विद्या काय शिकविली, नवीन इतिहास त्यांस काय कळला व लोकातील दुर्गुण त्यांनी कोणता कमी केला, नवीन शोध त्यांनी काय लाविले, हे पहावे. फक्त जेथे राहतील तेथे पुष्कळ श्राद्धे करवतील; क्षीर व दक्षणा मिळवतील. एवढा मात्र या विद्वानांचा उपयोग आहे. हे विद्वान कसे, हे कोणी विचार करून पहात नाही.
 जे फक्त पाठ म्हणविणारे, अक्षरशत्रू, अर्थ काही कळत नाही, धड व्यवहारप्रकरणी बोलता येत नाही, त्यापासून राज्याचे विचार व लोकांस चांगल्या रीतिभाती व शहाणपण लावणे कसे होईल? मूर्ख कुळंबी, शेतभात करणारे व बिगारी याहूनही निरुपयोगी भट आहेत, त्यांस विद्वान म्हणतात. आणि असली विद्या वाढावी, म्हणून इच्छितात, ही चूक आहे. आजपर्यंत ही विद्या वाढून लोकांची घरे बुडाली. इंग्रज लोक इकडे येऊन आम्हास शिकवू लागले, आम्हास शहाणपण नाहीसे झाले; आम्हास काही ठाऊक नाही, हे भटाचे विद्येचे परिणाम झाले. जर हे लोक खरी विद्या म्हणजे ज्ञानाचा शोध करावयाचा तो करिते, तर इंग्रज इकडे येण्याचे पूर्वी आम्हीच त्यांचे देशात का गेलो नसतो?