Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३८१

चोपदार, हत्ती, उंट काही नको. असे म्हणतात.
 पण कोणी असे मनात आणीत नाही की, या डौलाचा काही उपयोग नाही. इंग्रज लोक डौलाची गरज ठेवीत नाहीत; फक्त कामाची गरज ठेवतात. बरे, निरुपयोगी डौल लोकांस दाखवावयास बाळगत नाहीत. दहाच माणसे बाळगतात; परंतु चांगली, सर्व उपयोगी पडावी अशा रीतीची बाळगतात; परंतु आमचे राजे डौली त्यांस आम्ही थोर, हे स्वारी मोठी करून दाखवावयाचे असते; परंतु पराक्रमहीन, गुणहीन, त्यांस कोणी पुसत नाही. गोंधळी व ते बराबर. याजमुळे ते दहाशांच्या खर्चात ५० माणसे बाळगतात; परंतु ते काही उपयोगी पडावयाचे नाहीत. असे असतानाही देशातील आळशी लोक त्यांस चांगले म्हणतात. हे केवढे आश्चर्य आहे!
 कोणास हा विचार कळत नाही की, हे गोंधळी, वऱ्हाडी, दिसतात चांगले; सोने, रुपे, हिरे यांचे दागिने अंगावर घालून नटतात व सजतात, परंतु त्यांच्या तोंडात कोणी मारली, तर त्यांचा हातदेखील वर होत नाही. इतके अज्ञानी व अशक्त असतात. मग त्यांचा उपयोग काय? याजकरिता हा डौल काही उपयोगी नाही. राजाने जितका लोकांच्या रक्षणार्थ खर्च लागेल. तितकाच करावा. अधिक केला, तर तो दोषी व चोर होतो; परंतु ही गोष्ट राजे मनात आणीत नाहीत. आणि राज्य हाती लागताच लोकांची गरज सोडून देतात आणि मनास येईल तसे उडवितात. त्यांस त्याची लाज वाटत नाही. याजकरिता डौलाची प्रीती अगदी करू नये तर बरे.
 फौज पाहिजे व उपयोगाच्या सर्व गोष्टी पाहिजेत. तसेच आमचे लोक धर्म करणे, तोही उपयोग मनात आणून करीत नाहीत, याजमुळे बहुत पैसा व्यर्थ जातो; परंतु लोक असे मूर्ख आहेत की, जो मनुष्य अशी पैशाची उडव करितो, त्यांस चांगले म्हणतात व आळशी लोकांचे पोषण व निरुपयोगी व्यय पाहिला, म्हणजे त्यांस चांगले म्हणतात. अशा गोष्टीस चांगल्या म्हणणारांत प्रमुख कसबिणी आणि भट आहेत. हे लोक बहुत लोकांस वेडे करतात. पैशाची उधळपट्टी जितकी होईल, तितकी त्यांस हितावह आहे, म्हणून उत्तेजन देऊन उधळपट्टी करतात; मग त्यात जरी मोठाले अनर्थ झाले, तरी चिंता नाही; परंतु आपले पोट भरले, म्हणे झाले. कदाचित म्हणतात, त्याने इतका अन्याय केला; परंतु ब्राह्मणभक्त व ब्राह्मणाचे घरात सर्व पैका घातला. तस्मात् तो पुण्यवान प्राणी आहे.
 याजमुळे जो आता लोकांमध्ये संभावितपणे वागतो, त्यांस मुख्य गोष्ट ही करावी लागते की, भटांची मर्जी राखिली पाहिजे, भटास देणे हे मोठे