Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३८३

परंतु त्यांचे देशाची वार्तादेखील इकडे ठाऊक नाही. मग जाणार कोठून? वास्तविक विद्या काय ती त्यांस कळत नाही व पुढे पाऊलही टाकीत नाहीत. आपसांत रडत बसतात; परंतु विचार कोणीच करीत नाहीत. लग्नाचे आमंत्रण केले, तर पाचशे लोक येऊन चार घटका येऊन बसतील; परंतु विचाराचे सभेस जमावयाचे असेल तर एकही येणार नाही व एकाच्यानेही भाषण व विचार सयुक्त होणार नाही.
 असे हे लोक निर्बल व वेडे झाले. मग त्यांच्या तोंडात प्रथम मुसलमानांनी मारली. नंतर इंग्रजांनी मारली, याचे आश्चर्य काय आहे? त्यांच्याने आपले रक्षण होईना, उगेच बसवेना, आपसांत भांडू लागले. चोऱ्या, दरोडे घालू लागले. रोज स्वतः दरोडे घालू लागले. तेव्हा त्यांचे पारिपत्य करण्याकरिता इंग्रज यांची योजना ईश्वराकडून ये देशात झाली, हे सर्वोत्कृष्ट आहे. लोकांनी असे जाणावे की, हे लोक आम्हास उत्तम गुण व चांगल्या नीती व विचार व विद्या देऊन जातील यात संशय नाही.

♦ ♦