Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८० : शतपत्रे

नसले, तरी तेच ओझे वाटते व दुसरे काम करावयास कंटाळा येतो. जर कामदार तरुण असला, तर लबाडीचे कामात, नाच तमाशात रात्रंदिवस काळ घालवितो. त्याच्याने सरकारी काम देखील चित्त घालून करवत नाही, मग शिवाय काम होणार कोठून? व जर तो म्हातारा जुना कपी असला, तर त्यांस सरकारी काम आटपून घरी जाऊन स्नानसंध्येत संध्याकाळी व प्रहरभर सकाळी गोष्टी सांगत देवतार्चन पुढे मांडून बसावे लागते. त्यांस सरकारी कामाशिवाय दुसरे काम पाहणे व शाळा पाहणे, हे तर असे वाटते की, व्यर्थ काळ गेला. यात धर्म नाही, पुण्य नाही, देवपूजाही नाही. तेव्हा कशास करा?
 देवपूजा प्रहरभर केली, म्हणजे चार भिक्षुक वगैरे मूर्ख येतात, ते म्हणतात की, 'वाहवा! दादासाहेब मोठे भक्तिवान, पुण्यशील. दोन प्रहर स्नानसंध्येत घालवितात व सरकारी काम संभाळून नित्य नेमाने हे चालवितात.' अशी स्तुती करतात. ती गोष्ट लागून त्याला शाळा पाहण्याचे मोठे संकट पडते.
 याप्रमाणे लोकांचे उदासीन स्वभाव आहेत. विद्यावृद्धीविषयी व शिवाय किती एक दुसरे प्रकरणांत असेच आहे. सरकारास मदत मिळत नाही. यास्तव सरकारचा उपाय नाही. तर हे स्वभाव लोकांनी सोडले पाहिजेत.

♦ ♦


डौल व नेटिव राजे

पत्र नंबर ९८

 आमचे लोकांची बुद्धी अद्यापि सुधारली नाही. यामुळे त्यांस अद्यापि असे वाटत नाही की, आम्ही मूर्ख आहो.
 इंग्रज वगैरे युरोपियन आपणास केवळ मूर्ख म्हणतात व आम्हास दुसऱ्यापासून बुद्धी शिकोन घेतली पाहिजे. एखादा सरदार याचा डौल पाहिला, म्हणजे त्यांस असे वाटते की, वाहवा, हा मोठा सरदार, याचा डौल फार, हा थोर. परंतु त्याची योग्यता व गुण पहात नाहीत. फक्त त्याचे सोनेरूपे पाहून त्यांस चांगला म्हणतात. गाईकवाड यांचा डौल पाहून सर्व लोक म्हणतात की, पहा यांची गजान्त लक्ष्मी, आणि इंग्रज हे भिकारी यांस स्वारी नको,