Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३७७

 एकाने पंचविसावे वर्षी संन्यास घेतला आणि मग यात्रा करण्याकरिता पैसा मिळविला. मला वाटते की, हा मूर्ख संन्यासी आहे. याला रोजगाराने पैसा मिळविण्याचा टाकून संन्याशी व्हावयास कोणी सांगितले? बरे, संन्यासी झाला, तर मग भीक मागत का फिरावे? तसेच यात्रेकरू, तसेच लग्ने करण्याकरिता पैसा मागणारे, हे सर्व लोक बेवकूब आहेत. हे सर्व उद्योग करून पोट भरतील तर चांगले व गृहस्थांनी असा विचार द्रव्ये करून कदापि वृद्धिंगत करू नये.
 मला मोठा चमत्कार वाटतो की, एक मनुष्य येतो आणि म्हणतो- माझे लग्न व्हावयाचे आहे; मला दोनशे रुपयांचे साहित्य पाहिजे. ज्या मनुष्यास साहित्य नाही; तो लग्न करतो कशास? तसेच बैरागी शंभर आसामींचा मेळा घेऊन फिरतात. ते सगळे जर चाकरी ठेविले, तर एक रिजमिंट चांगले भरेल, असे ज्वान बळकट असतात, आणि म्हणतात की, आम्ही यात्रा करीत फिरतो व त्यांस लोक पैसा देतात. पण ही ढोंगे मोडून सर्व लोकांस शुद्धीवर आणले पाहिजे. तसेच विद्वान जे लोक आहेत, त्यांनी स्वदेशाचे व्यवहार, रोजगार व द्रव्य यांची वृद्धी कशाने होईल? जगात वर्तमान काय चालले आहे? लोकांची दशा काय झाली आहे? याचा विचार केला पाहिजे. केवळ व्याकरण पढून जन्म घालवून उपयोग नाही. ही रीत मोडेल, तेव्हा या देशाची सुधारणा होईल, हे सत्य आहे.

♦ ♦


इंग्रज सरकार

पत्र नंबर ९४

 इंग्रज सरकार या देशात आहेत, याविषयी लोक उघड नाही, तरी मनातले मनात कुरकुर पुष्कळ करतात व मुख्यत्वेकरून भट, पंडित, शास्त्री हे तर फार हैराण आहेत; परंतु माझे मत असे आहे की, या देशास हेच सरकार ठीक आहे.
 प्रथम असे पहा की, मागले सरकार किती वाईट व मूर्ख होते. जिकडे-तिकडे जुलूम होत होता. हे हल्ली जे इंग्रज सरकारचे पदरी मराठे अंमलदार आहेत, त्यांची वर्तणूक कशी आहे, हे पाहिले म्हणजे ध्यानात येते.