Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३७६ : शतपत्रे

करावा. एक लबाड कांबळेबाबा म्हणून उत्पन्न झाला. त्याने चार लुच्चे जमा करून ढोंग उभे केले. ते मुळी पुण्यात उभे केले. त्याचे मूळ प्रसिद्ध आहे व त्या बाबाचे दुराचरणही प्रसिद्ध आहे. तो चार मजूरदार उभे करून ढोलकी, झांज, वीणा वाजवीत लोकांची कानठळे बसवीत तो पुण्यात ओरडत फिरे. याप्रमाणे तो लबाड ढोंगी सर्वांस ठाऊक असून त्यांस पैका मिळाला. व लोक त्याचे आचरण न पाहता, व त्याने आपली स्त्री त्यागिली व आणखी किती लबाड्या केल्या, त्या मनात न आणता त्याचे पायावर डोकी ठेवतात, त्यास पैसा देतात व फुले घालितात. हे तमाशे पुण्यातील सर्व लोकांस माहीत आहेत. जसे तमाशाचे फडावर लोक मिळतात, तसे या बाबाचे भोवते तुळशीबागेत लोक जमत आणि त्याची कोणी थट्टा करीत; परंतु भजन करणारे शेकडो होते. म्हणून त्यांस द्रव्य मिळाले. तो बाबा बडोद्यास गेला व मुंबईस गेला; परंतु त्याने द्रव्यच मिळविले. कोठे भिकारी झाला नाही. तस्मात् सर्व ठिकाणी हिंदू लोक सारखे मूर्ख आहेत.
 म्हणून धर्म कोणास कळत नाही. ईश्वराचे भय कोणाचे मनात नाही. परधर्म त्यांस वाईट वाटतो; परंतु एक चमत्कार पहा की, जो प्रथम स्वधर्म टाकून दुसरा धर्म घेतो, त्याची हेळणा फार होते. जो मूळचा परधर्मी किंवा दोन चार पिढ्यांचा आहे, त्याचे द्वेष लोक करीत नाहीत. याचे कारण की लोकांस धर्माचा द्वेष येत नाही; परंतु चाल व जात मोडण्याचा येतो. धर्म कसा काय हे ते जाणत नाहीत. रूढी जाणतात. व त्या रूढीविरुद्ध जे चालतात, सर्वांस शहाणपण येऊन ते धर्मात्मे झाले पाहिजेत.
 नीती, ज्ञान विस्तीर्णतेने लोकामध्ये प्रसिद्ध झाले पाहिजे. व ढोंगी लोक नाहीसे झाले पाहिजेत. वरती उदाहरण एकच लिहिले आहे. परंतु असे किती एक ढोंगी लोक या हिंदुस्थानात फिरून गृहस्थांचा पैसा खात आहेत त्यांचा उपयोग काही नाही. हे लोक कमी होऊन, वास्तविक विद्वान वाढून ते आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांस करतील व जे लोकांची नीती, व धर्म व सदाचरण वृद्धी करण्याचा प्रयत्न करतील, त्यांस मात्र लोकांनी द्रव्य देऊन त्यांचे चालवावे.
 असे न करतील, तर मग त्यापेक्षा मजुरी करणारे बरे. ते आपल्या पोटास मिळवून खातात. परंतु असे लोक फुकट खावयास योग्य नाहीत. जे उगेच ढोंग माजवून बसतील आणि लोकांस सांगतील की, आम्ही देवाजवळ पारायण केले, आम्ही उपास केले. आम्ही प्रदक्षिणा घातल्या. आम्ही नवस केला. आम्ही तपश्चर्या केली. आम्ही पंढरपुरी राहतो, आम्ही आळंदीस राहतो, व आम्ही यात्रा करतो; तर या लोकांस देण्याचा संबंध काय?