Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३७८ : शतपत्रे

याच प्रकारचे मागे सर्य लोक होते. त्यांनी देशाची सुधारणा व विद्यावृद्धी काहीच केली नाही. फक्त भट, वैदिक व मूर्ख लोकांचे पोषण करून रक्षिले. तसेच पेंढारी, रामोशी, काटक, डाकवदे, ठक, चोर इत्यादिकांस राखिले आणि देशात लूटसांड पुष्कळ करीत.
 होळकर स्वतः श्रीमंताचा चाकर असता त्याने पुणे लुटिले, व लोकांचे हाल केले. अशा सरकारास कोण चांगले म्हणेल? जो बळकट असेल, तो मात्र पोटभर खाई. पाहिजे त्याने शेतभात, गांवघर लुटावे; दादफिर्याद कोठे लागत नव्हती. हल्ली हैदराबाद, ग्वाल्हेर येथे वर्तमान काय आहे ते पहा, म्हणजे मागील राजाचे सर्व लक्षात येईल.
 तेव्हा मागील राज्य अगदी वाईट होते हे सिद्ध आहे. याशिवाय हल्ली आमचे लोकांस राज्य मिळाले तर तीच अवस्था करतील. तेव्हा हेही उपयोगी नाही. बरे, दुसरे देशचे लोक मोगल, फराशीस वगैरे आले, तर तेही वाईट लोक आहेत. यास्तव इंग्रज हेच सुधारलेले चांगले लोक आहेत. यांचे राज्य या देशात आहे, हेच चांगले. व ईश्वराने हे आम्हास चांगले राजे दिले आहेत. हे खचित दिसते. याहून चांगले राजे आम्हास कदापि मिळणार नाहीत. याशिवाय हे सरकार लोकांची सुधारणा करण्याकरता अत्यंत मेहनत करीत आहे. त्यांस विद्या शिकविते. तीही कशा रीतीने शिकविते की लोकांत तर जुलूम वाटू नये.
 त्यांची देवस्थाने वगैरे सर्व कायम पहिल्यप्रमाणे ठेवून त्यांची मर्जी राखून, त्यांस वाईट न वाटता शिकविण्याची तजवीज चालविली आहे. इतक्या युक्तिप्रयुक्तीने कदापि कोणी राजा या लोकांस शहाणा करणारा होणार नाही. इंग्रज लोक अत्यंत सुधारलेले म्हणून या रीतीने त्यांनी विद्यावृद्धीचे व लोकसुधारणेचे व त्यांच्या जुन्या मूर्ख समजुती जाण्याचे काम चालविले आहे. इतकी तजवीज कोण करील? आता येऊन जाऊन इतकेच म्हणतात की, अद्यापि ते लोकांस मोठ्या चाकऱ्या देत नाहीत; परंतु मोठी चाकरी देण्यास लायक लोक अद्यापि झाले नाहीत.
 ज्या लोकांस लाच खावा हे पाप वाटत नाही, ज्यास ब्राह्मणापेक्षा कुळंब्याचा जय कमी व्हावा, असे वाटते; त्यांस विद्यावृद्धी व्हावी असे वाटत नाही, लोकांस कायदे कोणचे असावे. पहिले शास्त्र कोणत्या योग्यतेचे व पुढे कायदे कोणत्या योग्यतेचे असावे, हे समजत नाही; व कायदा राज्यास असावा, हे अवश्य आहे किंवा नाही; हे राजास कळत नाही; व आपले जातीचा अभिमान