Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३७५

नाही वा हिशेब समजत नाही. कोणी पुसले की, तुम्ही जन्मापासून केले काय? तर ते म्हणतात की, कृष्णातीरी अमक्याचे घरी जेवणाची सोय होती, तेथे जेवीत होतो व आता बारा वर्षे अधयन करून तयार झालो आहे. कोणाशीही वाद करू, पोथ्या सर्व पाठ आहेत; साठ हजार कौमुदी अवगत आहे. उपस्थिती चांगली आहे. याप्रमाणे हे एवढाले मोठे पंडित असतात; पण त्यांस यत्किंचित ज्ञान नसते. त्याजकडे काही कारभार सांगा आणि मग त्यांचा चमत्कार पहा की, ते किती भितील, किती गोष्टी लोकांस पुसतील! त्यांस लिहिणार दुसरा पाहिजे, हिशेब करता येत नाही, स्वतः बुद्धी नाही, शहाणपण नाही, कोणत्याही कामाच्या उपयोगी ते पडत नाहीत.
 जसे जन्मास आले म्हणजे अज्ञान, तसेच ज्ञान असून स्वतः उपजीविका मिळविण्याचे सामर्थ्य नाही. त्यांस कोणी असा श्रीमंत पाहिजे की, नेहमी पाचशे रुपये घरी पोचवील आणि शालजोड्या देईल. असो. असा मान करून कोणी त्यांस जवळ ठेवले, म्हणजे मग शास्त्रीबाबा बहुत शोभतात. परंतु श्रीमंताचा आसरा नसू द्या, म्हणजे मग त्यांची काय अवस्था होईल ती पहा. हे काय करतील? यांस काही व्यवहारी विद्या येतच नाही. व्यापारधंदा काही कळत नाही व कायदाकानू काही माहीत नाही. असे गोळे असतात. अशा लोकांचे तुम्ही काय कराल?
 बरे, लोकांस उपदेश करण्यास योग्य म्हणावे, तर तेही नाही. त्यांचे हातून चांगला उपदेश व्हावयाचा नाही व धर्माची सुधारणा व्हावयाची नाही. केवळ उकिरड्याचा ढीग आणि त्यांचे पटणे सारखे आहे. मला कोणी तरी दाखवावे की, शास्त्र्यांचा अमुक उपयोग आहे. काही दिसत नाही. ज्या देशात असे लोक मूर्खशिरोमणी आहेत, तेथे दरिद्र, कुनीति, अज्ञान, मूर्खपणा हेच वृद्धिंगत होत जातील. व हल्लीचे गृहस्थ जे आहेत, ते बदलून दुसरे प्रकारचे झाले पाहिजेत. यांच्या आधारावर हे सर्व मूर्खपणा वाढवितात. सरकारचा आसरा आता नाही; परंतु रयतेचा खुशीचा आसरा अजून फार आहे. तो देऊ नये असे या गृहस्थांस कळले पाहिजे.
 कोणी गृहस्थ एका भटापासून एक चंडी म्हणवितो, आणि त्यांस रुपया देतो. कोणी गृहस्थ शास्त्र्याचे बोलणे करवितो व त्यांस शालजोडी देतो व कोणी अग्निहोत्र्यास इनाम देतो. याप्रमाणे देऊन निरुपयोगी माणसे वृद्धिंगत करतात. हेच देणे उपयोगास लागले, तर किती फायदा होईल? द्रव्यवान असेल त्याने आपले द्रव्य नदीत टाकले, तरी तो व्ययच झाला व व्यापारात ठेविले किंवा धर्म केला, तरीही व्ययच झाला; परंतु चांगले कोणते, याचा विचार