पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २९

मूल्य आहे, हे मत आज सर्वमान्य झाले आहे. लोकहितवादींनी आजचे शब्द, आजची भाषा वापरली नसली तरी त्यांचा आशय तोच आहे, हे वरील पत्रांवरून व पुढे दिलेल्या अनेक उताऱ्यांवरून ध्यानात येईल.
 ४. विधवाविवाह :- स्त्रियांच्या पुनर्विवाहासंबंधी लिहिताना लोकहितवादी अंतर्बाह्य संतप्त झालेले दिसतात. स्त्रियांवरील घोर अन्याय पाहून त्यांचे काळीज तिळतिळ तुटते व तो घोर अन्याय करणाऱ्या शास्त्रकारांना, ब्राह्मणांना कोणतीही शिक्षा केली तरी ती अपुरीच आहे असे त्यांना वाटते. ते म्हणतात, 'सांप्रत आपले लोकांमध्ये हा केवढा अनर्थ आहे की, स्त्रियांस पती वारल्यानंतर पुनरपि लग्ने करू देत नाहीत ! ईश्वराने स्त्री व पुरुष सारखे उत्पन्न केले व उभयतांचे अधिकार समसमान आहेत; असे असता पुरुषांस पुन्हा विवाहाची आज्ञा, स्त्रियांस मात्र मनाई, हा केवढा जुलूम आहे? 'जे शास्त्री, दशग्रंथी ब्राह्मण विधवाविवाहास विरोध करतात ते विद्वान कशाचे ?' जे गृहस्थ आपल्या कन्यांच्या पुनर्विवाहास संमती देत नाहीत त्यांना लोकहितवादी मांग, खाटीक, कन्यांचे वध करणारे अशा शब्दांनी संबोधितात. त्यांच्या मते हे कलियुगातील राक्षसच होत. त्यांना माणसे खाणारेच समजावे. 'जेव्हा पूर्वी हिंदू लोक भोळसर होते व पंडितांचे ऐकणारे होते, तेव्हा त्यांनी विधवांनी सती जावे म्हणून सांगितले व तेच लोकांनी कबूल करून आपल्या सुना, मुली, बहिणी जिवंत जाळल्या. हे राक्षस नव्हेत तर काय ?' (पत्र क्र. १०२)
 ५. अनाथ विधवा :- 'ब्राह्मण लोकांत लग्नाची घाई फार करतात. त्यामुळे कित्येक मुलामुलींची लग्ने आठव्या वर्षाच्या आतच होतात. आणि पुढे दोनचार वर्षांत विपरीत गोष्ट घडून भर्ता निधन पावतो. त्या काळी वास्तविक पाहिले तर त्या मुलीस आपली जाती किंवा नाते कळत नाही. केवळ बाला, अज्ञान आणि परस्वाधीन अशी अवस्था तिची असते. परंतु पुनरपि तिचा विवाह करीत नाहीत. आणि मायबाप आपले मन क्रूर, निर्दय करून तिची विपत्ती पाहतात. ती विपत्ती एक पर्यायाची नाही. परंतु अनेक पर्याय त्यात असतात.' (पत्र क्र. ९९). 'सासू-सासरे म्हणतात ही करंटी अवदसा नवऱ्यास मारून आम्हास तोंड कशास दाखविते?' माहेरी भाऊ-बहिणी म्हणतात, 'आमचे घरी तुझे काय आहे ? इथे कशास येतेस ?' बरे, रस्त्यात फिरले तर लोक म्हणतात, 'बोडकी पुढे आली, पाऊल कसे टाकावे ? बरे, कोणाचा आश्रय करावा तर तेथे टीका होते की, रंडकी मुंडकीस तूप-दही कशास हवे? गादी निजावयास कशाला हवी? तेव्हा तिला बैराग्यासारखे संसारात राहून दिवस काढावे लागतात.