पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८ : शतपत्रे

कन्येविषयीच्या वात्सल्याने उमाळा येऊन लिहावे तसं लोकहितवादींनी लिहिले आहे.
 ३. बालविवाह :- बालविवाहाच्या चालीने आपल्या समाजाचे सर्व कर्तृत्व मारले गेले आहे व आपला अनेक प्रकारे नाश झाला आहे असे लोकहितवादींचे निश्चित मत झाले होते. शतपत्रांतून त्यांनी ते अनेक ठिकाणी मांडले आहे. 'लोक डोळेझाक करून आपल्या पोरांची व पोरींची त्वरित लग्ने करतात. येणेकरून दोघांचे दुःख वाढते. बापास लहानपणी पोरे व सुना चांगल्या दिसतात परंतु त्याचे पाठीमागे त्यांचे हाल कुत्रा खात नाही. याचा विचार लोक करीत नाहीत व लग्नाची घाई करतात. येणे करून लोक अल्पजीवी, पराक्रमहीन व मूर्ख झाले आहेत. पंधरावीस वर्षांचा मुलगा झाला नाही तोच लोक म्हणतात की, लग्न का झाले नाही ? आणि मग आईबापांचा अगदी प्राण जाऊ लागतो. या मूर्खपणास काय म्हणावे ?' (पत्र क्र. ५३). लोकहितवादी म्हणतात की, 'आईबापांनी मुलांना शहाणे करण्याची फक्त जबाबदारी घ्यावी. पुढे त्यांचे लग्न ती स्वसामर्थ्याने करतील. त्याची काळजी आईबापांनी करू नये. परंतु रोजगारधंदा नाही, शहाणपण नाही व पुढे कसा निघतो याचा अंकूर नाही, तोच त्याचे गळ्यात मुलगी बांधून जोखिमात घालावा व त्याची विद्या, आयुष्य सर्व बुडवावे यात काय लाभ होतो ? लग्न बापाने केले म्हणजे त्यात काय मोक्षसाधन आहे ? ज्याचा तो आपले पराक्रमाने करील तर फार चांगले.' (पत्र क्र. २) लग्ने आपण करावी असा त्याहीपेक्षा क्रांतिकारक विचार त्यांनी मांडला आहे आणि तोही आगरकरांच्या आधी पन्नास वर्षे. 'लग्नाविषयी विचार' या पत्रात ते म्हणतात, 'मुलीचे लहानपण विद्या शिकविण्यात घालावे व पुढे सरासरी वीस वर्षांचे आत तिला कळू लागले म्हणजे तिचे व आईबापांचे संमतीने लग्न करावे. येणेकरून बहुत फायदे होतील.' यापुढे बालावृद्धविवाहाचा निषेध करून ते विचारतात, 'जर स्त्रियांना स्वसत्तेत लग्न करून दिले तर, अशा प्रेतरूप पुरुषास त्या वरतील काय ? तेव्हा या चालीचे फार वाईट वाटले होते. जे विद्या करण्याचे वय ते सासऱ्यास राहण्यात व हाल सोसण्यात जाते व लवकरच लग्नाचा संबंध झाल्यामुळे कोणतेही प्रकारे सुखावह होत नाही.' (पत्र क्र. १५)
 विवाहाचे स्वातंत्र्य फक्त पुरुषांनाच असावे असे नाही, तर लोकहितवादींच्या मते ते स्त्रियांनाही असावे. आज आपण स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाची भाषा बोलतो. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र स्वयंपूर्ण आहे, दुसऱ्या कोणाच्या सुखाच्या अपेक्षेने तिने जगावे असे नसून तिचे व्यक्तित्व हे अंतिम