पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २७

सहानुभूतीची, उदार व आजही अद्ययावत वाटावी अशी आहे, हे शतपत्रे वाचीत असताना पदोपदी प्रत्ययास येत असते.
 १. स्त्रीची प्रतिष्ठा :- 'ज्या देशात स्त्रियांचे अधिकार लोक मानीत नाहीत, त्या देशात लोकांची स्थिती वाईट असते.' असे आपले मत लोकहितवादींनी स्पष्टपणे सांगितले आहे. ते म्हणतात. 'सांप्रत हिंदुलोकांत फारच मूर्खपणा आहे. यास्तव स्त्रियांची दुर्दशा फार आहे. प्राचीन काळी असे नव्हते. मागील काळचे कथेवरून पाहता असे दिसते की, पूर्वी हिंदू लोकांत स्त्रियांचा मान फार होता. पुण्याहवाचन वगैरे धर्मसंबंधी काही एक कर्म स्त्री बरोबर असल्यावाचून होत नाही. राज्याभिषेकातही राणीस फार मान असे. यावरून स्त्रियांचा प्रमुखपणा मानला आहे असे दिसते. पुढे मुसलमानांच्या अनुकरणाने त्यांच्या रानटी चाली हिंदू लोकांस लागल्या. धर्मातही त्यांचे अनुकरण होऊ लागले. हिंदू लोक ताबूत करू लागले, फकीर होऊ लागले, धर्मभ्रष्ट झाले. त्यामुळे हिंदू लोक स्त्रियांचा अपमान करून त्यांस जनावराप्रमाणे मानू लागले. पूर्वी रामाबरोबर सीता सभेत बसत होती. पांडव द्रौपदीसह बसत होते. पण लोकांची मने आता इतकी बिघडली आहेत की, जर त्यांस हे सांगितले तर ते देव होते, असा जबाब देतात. परंतु असे लक्षात आणीत नाहीत की ती माणसेच होती.' (पत्र क्र. ३०).
 २. सध्याचा दृष्टिकोन :- 'अशा वृत्तीमुळे सांप्रत काळी ब्राह्मण लोकांत स्त्रियांचे हाल व विपत्ती बहुत होतात. कन्या झाली म्हरजे लोक नाक मुरडतात. त्यांना वाटते की माझे घरात ही अवदसाच शिरली.' (पत्र क्र. १५). 'हे हाल व विपत्ती, ही जनावरासारखी अवस्था, ही ज्ञानशून्यता व पुरुषांची क्रूरता प्राचीन शास्त्राधारे बहुत दिवस चालली. पण आता तरी हा ईश्वरी क्षोभ जावो व जसे पुरुष तशा स्त्रिया आहेत, असे आंधळ्या हिंदू लोकांस समजो. ही माझी अतिशय तीव्र इच्छा आहे; तर जे सुधारक हिंदू असतील त्यांनी या कामास निर्भयपणे प्रारंभ करावा.'(पत्र क्र. १६).
 स्त्रियांच्या सुधारणेविषयीची आपली तळमळ लोकहितवादींनी याप्रमाणे अनेक पत्रांत व्यक्त केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या दुःस्थितीच्या कारणांनी, हीन दुष्ट रूढीची चर्चा करून त्यावर उपाययोजनाही सांगितली आहे. सतीची चाल, बालविवाहपद्धती, विधवाविवाहाची बंदी आणि स्त्रीला अज्ञानात ठेवण्याची प्रथा या सर्व रूढींवर व त्यांना आधारभूत असलेल्या शस्त्रांवर लोकहितवादींनी अतिशय कडक टीका केली आहे. ही पत्रे लिहीत असताना स्वतःच्या