पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६ : शतपत्रे

 १०. जसे ब्राह्मण तसे सरदार:- लोकहितवादींनी ब्राह्मण, शास्त्रीपंडित, भटभिक्षुक यांवर टीका केली तशी सरदार, राजे लोकांच्यावरही शतपत्रांतून प्रखर टीका केली आहे. शास्त्रीपंडितांना विद्येची आवड नव्हती आणि सरदारांना होती असे मुळीच नाही. त्यांना लोकहिताची चिंता नव्हती आणि त्यांना होती असेही नाही. स्वार्थ, लाचारी ब्राह्मणांना सुटली नव्हती तशीच त्यांनाही सुटली नव्हती. त्यामुळे समाजाचे नेतृत्व करण्यास ते तितकेच नालायक होते. लोकहितवादी म्हणतात, 'आमचे राजे किती मूर्ख असतात ते बाजीराव पेशवा, सातारचा राजा व दौलतराव शिंदे यांची उदाहरणे घ्या म्हणजे समजेल. सातारचा राजा एखादे चित्र सजवून न्यावे तसा रेसिडेंटाकडे जातो. काही न्यायकारभार करीत नाही. बसला असता तेथून लोकांनी हात धरून उचलले पाहिजे ही त्याची शक्ती ! राज्यात खबर काय आहे त्यास ठाऊक नाही. रयतेकरवी विद्या करविणे ठाऊक नाही. किती एक सरदार इतके मूर्ख आहेत की, ते साहेबलोकांना म्हणतात, तुम्ही देवांप्रमाणे आम्हांस आहां. तुम्ही जे कराल ते होईल.' (पत्र क्र. ७८). 'पुण्यात लायब्ररी केली पण ग्रंथ वाचावयास सरदार लोक येत नाहीत. त्याविषयी मला असे वाटते की, आम्ही थोर, चार शिपाई, घोडे, अबदागीर, बरोबर घेतल्यावाचून कधी बाहेर पडत नाही. तेव्हा या लायब्ररीतून मुलासारखे शिकावयास जावयाची त्यांस लज्जा वाटत असेल. अज्ञानामुळे व अनश्रुतपणामुळे त्यांची अशी अवस्था झाली. तत्रापि तिचा परिहारोपाय ते ग्रहण करीत नाहीत, हे आश्चर्य आहे.' (पत्र क्र. ३). 'पन्नास कुळंबी गावातील नांगर धरून मेहनत करतात आणि एक जहागीरदार किंवा इनामदार त्यांस फक्त कोंडा ठेवून त्यांचे दाणे घेतो व आपण रेशीमकाठी धोतरे नेसतो व कामकाज काही करीत नाही. एका राजाचे पोर क्षयी असते, परंतु त्याचे सर्व लोक आर्जव करतात आणि त्यास सर्व दौलत देतात व आपण उपाशी मरतात. बरे, त्याने स्वत: काही काम केले आहे काय ? नाही ! तत्रापि लोक आंधळ्यासारखे त्यास बलिष्ठ मानतात !'

४. स्त्रीजीवन


 जातिभेद, चातुर्वर्ण्य, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व या सर्वांच्या बुडाशी जी जन्मनिष्ठ उच्चनीचता असते ती समाजाला जशी अत्यंत घातक असते तशीच स्त्रीपुरुषातील विषमताही असते. स्त्रीला समाजात पुरुषासारखी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावाचून तिच्या जीवनाचा विकास होणे शक्य नाही आणि तो समाजही तुलनेने पंगूच राहणार. हे जाणूनच लोकहितवादींनी स्त्रीपुरुष समतेचा सर्व वर्णांच्या व जातींच्या समतेइतकाच आग्रह धरलेला दिसतो. स्त्रीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अतिशय