पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २५

हालणार नाहीत.' (पत्र क्र. ४८). 'आमचे लोकांत ब्राह्मण पुढारी झाले याजमुळे फार घात झाला. जर कुळंबी, क्षत्रिय पुढारी असते तर बरे झाले असते. कारण ब्राह्मणांच्या हातापायांत बिड्या आहेत. ते परदेशात जाणार नाहीत, परभाषा शिकून ज्ञान मिळवणार नाहीत. असे ब्राह्मण लोक प्रतिबंधात पडले व त्यांच्यामुळे इतर जातींचे लोक सर्व प्रतिबंधात पडून आंधळे झाले, हे मोठे वाईट झाले.' (पत्र क्र. ९६).
 लोकहितवादींनी स्वकालीन ब्राह्मणांवर जी कठोर टीका केली ती त्यांच्या अज्ञान, विपरीत ज्ञान, अहंता, लोक, लाचारी या अवगुणांबद्दल होती आणि ती प्राधान्याने भट, भिक्षुक, शास्त्रीपंडित, वैदिक यांच्यावर होती, पण त्यात जातिद्वेषाचा अंशही नव्हता. कारण गुणसंपन्न, विद्वान ब्राह्मणांबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी आदर व्यक्त केला आहे. प्रशंसोद्गार काढले आहेत. ते म्हणतात, 'ब्राह्मणांचा स्वधर्म असा की आपली सद्-वर्तणूक आणि पवित्रपणा बाळगून विचार करीत अरण्यात स्वस्थ बसावे. म्हणजे तेच ऋषी व मुनी होत, व असे त्यांचे कर्म पवित्र व वागणूक निर्दोष म्हणून राजे त्या ब्राह्मणांस थरथर कापत होते व सर्व लोक त्यांचे भय बाळगीत होते. ते ब्राह्मण आपल्या सत्कर्मे करून सर्वांस सुशिक्षा लावीत होते व धर्मसुधारणेचा व लोकहिताचा विचार करीत होते. पण त्या प्रकारचा एक तरी ब्राह्मण काशीपासून रामेश्वरापर्यंत आता आहे काय ?' (पत्र क्र. २२). याच पत्रात प्रसिद्ध रामशास्त्री प्रभुणे यांचे उदाहरण देऊन ते म्हणतात, 'पेशवाईत एकच ब्राह्मण होता आणि तो जोपर्यंत होता तोपर्यंत राज्य कृतयुगाप्रमाणे चालले. त्या ब्राह्मणाचे नाव रामशास्त्री. आपले अकलेस आले ते श्रीमंतांसही सांगण्यास त्याने भीड धरली नाही. तोच धन्य !' इतरही अनेक पत्रांत प्राचीन कालच्या ब्राह्मणांविषयी त्यांनी असाच आदर प्रकट केला आहे व पुढील ब्राह्मणांवर टीका केली आहे. 'प्राचीन काळी हिंदू लोकांनी विद्या बहुत केल्या. पुढे ब्राह्मण लोकांनी नवीन विद्या करण्याचे सोडून दिले व वेदपाठ करू लागले. त्यांनी अर्थ सोडून दिला आणि धर्मशास्त्रात असे आहे की, आपला कुलाचार रक्षावा. त्याप्रमाणे जे बापाने केले तेच मुलाने करावे अशी समजूत पडली आणि जो जो हे मूर्ख होत चालले तो तो मागले लोक त्यांस देवासारखे दिसू लागले.' (पत्र क्र. ६१). त्यांच्या मते साधारण शंकराचार्यांच्या काळापर्यंत म्हणजे इसवी सनाच्या सातव्या आठव्या शतकापर्यंत ब्राह्मण खऱ्या विद्येची आराधना करीत, तप करीत. म्हणून त्यांना नेतृत्व करण्याचे सामर्थ्य होते. पुढे विद्योपासना संपली व त्यामुळे त्यांचा व त्यांच्याबरोबर समाजाचाही अधःपात झाला.