पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४  शतपत्रे

परखडपणे सांगितले असते की, 'श्रीमंत, तुम्ही नीतिभ्रष्ट, धर्मभ्रष्ट आहात.' पण हे ब्राह्मण त्याची स्तुतीच करीत गेले. महाराज सर्वत्र विजयी होतील असा ते त्याला आशीर्वाद देत. 'आपण ब्राह्मण प्रभू, आपले तेज सर्वांहून अधिक.' असेच ते म्हणत. असा मूर्खपणा त्यांनी केला व शेवटी आपण व तो दोघेही भीक मागत गेले. यास्तव हे पंडित जरी पुष्कळ पढलेले असले तरी ते मूर्ख समजावे. कारण लोकहितकारक ज्ञान त्यांना नाही. त्यांचे ज्ञानापासून मोक्ष व्हावयाचा नाही व इहलोकीही सुखोत्पत्ती व्हावयाची नाही.' (पत्र क्र. ८६). 'बाजीरावाचा भाऊ अमृतराव पेशवा याच्या उदाहरणावरून हेच दिसते. त्याने पुणे शहर लुटले. मुले, बायादेखील ठार मारल्या व कित्येक बायांनी जीव दिले, पैशासाठी त्याने अनेकांना राखेचे तोबरे दिले, धुऱ्या दिल्या, तापल्या तव्यावर माणसांना उभे केले. तेल तापवून पोरांच्या डोक्यावर ओतले. अशा रीतीने अत्यंत हीन, भ्रष्ट, अधर्म्य मार्गांनी पैसा मिळवून तो काशीस गेला. त्या वेळी तेथील धर्मवेड्या ब्राह्मणांनी त्याला काही शासन केले काय ? मुळीच नाही. त्यांनी प्रथम त्याला बहिष्कार घालण्याची धमकी दिली व मागाहून त्यास सांगितले की, तुम्ही जे द्रव्य आणले आहे त्यापैकी निम्मे ब्राह्मणांना धर्मादाय करावे. म्हणजे तुम्ही जातीत याल. त्याप्रमाणे त्याने अन्नछत्रे, ब्राह्मणभोजने, यज्ञयाग सर्व केले. लगेच ब्राह्मणांनी त्यास जातीत घेतले व ते त्याची स्तुती करू लागले. याच्या उलट उदाहरण एक बाबा भिडे यांचे आहे. हा गृहस्थ त्या वेळी प्रिन्सिपाल सदर अमीन या जागेवर होता. पण तो अत्यंत निःस्पृह होता. लाच मुळीच खात नसे, पण तो ब्राह्मणभोजनेही घालीत नसे. तेव्हा ब्राह्मण त्याची निंदा करीत.' (पत्र क्र. ७५). ही ज्या ब्राह्मणांची धर्मबुद्धी त्यांच्यावर लोकहितवादींनी अगदी कटू अशी टीका केली तर त्यात वावगे काय झाले ?
 ९. ब्राह्मणांचे नेतृत्व हे दुर्भाग्य :- अशा या ब्राह्मणांकडे हिदुसमाजाचे नेतृत्व शतकानुशतके होते, हे हिंदू लोकांचे परम दुर्भाग्य होय, असे लोकहितवादींना वाटते. 'लोक समजतात की, हे धर्मरक्षक आहेत. परंतु हे अधर्म वृद्धी करणारे होत. समाजाचे नेतृत्व करण्यास आवश्यक असा एकही गुण त्यांच्या अंगी नाही. एकास लाथ मारली तर दुसरा का म्हणावयाचा नाही. इतके हे भित्रे, रांड्ये व निर्बल आहेत. यांच्यामध्ये साहस, धैर्य आणि खरेपणा प्रायशः नाहीत. गोड खाण्यास मिळाले की सर्व ब्राह्मण एकत्र डोंगळ्याप्रमाणे जमतात व मग त्यांचे अवधान फार लागते. पण राज्यकारभाराची किंवा ज्ञानवृद्धीची सभा असेल तर