पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे २३

राघू. परंतु ज्ञान एकच. ब्राह्मण वेद पाठ म्हणतात. पण अर्थज्ञतेविषयी उभयतांची योग्यता समान आहे. अतिशूद्र गरीब. ते आपला लहानपणा जाणतात पण भट मूर्ख असून ज्ञानी समजतात व गर्व करतात. हा त्यामध्ये दुर्गुण अधिक आहे.' (पत्र क्र. ७१). 'मला ब्राह्मणांचे व इतर लोकांमध्ये भिन्नपणा काहीच दिसत नाही. ब्राह्मण मरतात, जन्मतात व हातपाय त्यांस इतरांसारखेच असतात. मग इतरांपेक्षा त्यांमध्ये काय फरक आहे ? व ब्राह्मणाला गर्व कशाकरता असावा ? त्यांचा मुख्य गुण काय ती विद्या. तिचे तर त्यांचेमध्ये शून्य पडून काळे झाले आहे. आणि त्यांचा आचार तरी काय ? कोणी जेवावयास किंवा वसंतपूजेस बोलाविले म्हणजे एका हातात तंबाखू व दुसरे हातात चुना आणि तोंडात वेदपठण. हे तरी उत्तम आहे काय ? तेव्हा असे भ्रष्ट झाले ते ब्राह्मण म्हणावे किंवा त्यास दुसरे काही म्हणावे ?' (पत्र क्र. २०) 'जसे इतर जातीचे सुतार, न्हावी, माळी तसेच हे मूर्ख राघूसारखे पढणारे वेदविक्रय करून पोट भरणारे व निर्लज्जपणे भीक मागून काम न करता खाणारे आहेत. ब्राह्मणांस ब्रह्मदेवाने फुकट खाते, अशी सनद करून दिली आहे काय ? बाजीरावाने ब्राह्मणांस पुष्कळ खावयास दिले, त्याचे ब्राह्मणांच्या आशीर्वादाचे काय झाले ? अन्न मात्र वाया गेले. आणि नाश व्हावयाचा तो झालाच. तर ब्राह्मणाच्याने काही होणार नाही हे मला पक्के ठाऊक आहे.' (पत्र क्र. २१). 'इंग्रजी राज्य झाले हे एक ब्राह्मणांचे महत्त्व नाहीसे होण्यास मूळ झाले आहे यात शंका नाही. ब्राह्मणांनी बहुत वर्षेपर्यंत थोरपणा व अधिकार भोगला. परंतु तो काळ आता गेला. बरे झाले की लोक आता पाहू लागले.' (पत्र क्र. ७७) याप्रमाणे इतर जाती ब्राह्मणांच्या अधोगामी वर्चस्वातून आता सुटणार याचे लोकहितवादींना समाधान वाटत आहे.
 ८. विपरीत, हीन धर्मबुद्धी :- ब्राह्मणांची, शास्त्रीपंडितांची धर्मबुद्धी अत्यंत विपरीत होती. त्यांच्या धर्मात नीती, सत्य, सदाचार यांना कसलीच किंमत नव्हती. एखादा मनुष्य अत्यंत नीच असला, त्याने अत्यंत हीन व अमंगळ कृत्ये केली असली तरी, तो जर ब्राह्मणांना भरपूर दानधर्म करील, भोजने घालील तर ते ब्राह्मण त्याला धर्मावतार मानण्यास तयार! त्यांची एक-दोन उदाहरणे लोकहितवादींनी दिली आहेत. 'दुसरा बाजीराव पेशवा अत्यंत व्यभिचारी, अधम व अशुचि होता. कसलेही कर्तृत्व त्याचे ठायी नव्हते. पण त्याने पुण्यात ब्राह्मणांचे मनोरथाप्रमाणे दाने केली व बहुत शास्त्रीपंडितांना जवळ बाळगले. त्या वेळी हे पंडित निःस्पृह असते, त्यांना खऱ्या धर्माची चाड असती तर त्यांनी त्याला