पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२  शतपत्रे

कारण त्यांचे हित तुमच्या वतनवृद्धीस विरुद्ध आहे. लोक जितके मूर्खपणात असतील व बायका जितक्या वेड्या असतील तितके तुमचे पीक अधिक. तेव्हा लोकांचे हित तुमचेकडून होईल कसे ? लोक खरा धर्म करू लागले तर तुमची उपजीविका कशी चालेल ?' (पत्र क्र. १०७) 'कोणी गरीब, आंधळे यांना उद्योगास लावण्यास खर्च करू लागला, कोणी शाळा काढू लागला तर ब्राह्मण पंडित त्यास सांगतील की, अरे शाळा कशाला ? तेथे पैसा देऊन काय पुण्य आहे ? ब्राह्मणाचे मुखी घातले तर पुण्य आहे. पुस्तके कशाला ? यातील ज्ञान काय उपयोगी आहे ? ब्राह्मण बोलावून त्यास दाने करावी. केळीचे दान सुवर्णासहित केले म्हणजे पुत्र होतो. ब्राह्मणास भोजन दिले की राज्य चिरकाल टिकते. भट असे सांगतील तरच त्यांचे पोट भरेल.'
 ६. ब्राह्मण माहात्म्य :- आपली वृत्ती अशी अविच्छिन्न चालावी यासाठीच ब्राह्मणांनी आपले माहात्म्य अतोनात वाढवून ठेवले आहे. आणि दुर्दैव हे की, हिंदुधर्मातील सर्व जातींची त्यावर श्रद्धा आहे. पुराणात म्हटले आहे की, ब्राह्मणाच्या केवळ दर्शनाने अनंत पापे भस्म होतात. त्यांना वंदन करून पूजा केली की मोक्ष प्राप्त होतो. विप्रांच्या चरणांच्या धुळीने आधिव्याधी नष्ट होतात. सागरात जी जी तीर्थे आहेत ती सर्व ब्राह्मणांच्या उजव्या चरणात आहेत. हे सर्व वर्णन खरे मानून लोक ब्राह्मराच्या पायाचे तीर्थ पितात. प्राचीन राजे, प्रत्यक्ष श्रीकृष्ण, ब्राह्मणांची सेवा करीत असत, उष्टी काढीत असत, ही उदाहरणे पुराणात आहेतच. वास्तविक खरा धर्म म्हणजे मन शुद्ध पाहिजे. ईश्वर शरीरात पहात नाही, मनास पाहतो. परंतु हल्लीचे ब्राह्मण पैसा काढण्यासाठी हे सांगत नाहीत. फक्त आचार, जेणे करून पैसा मिळवावयाचा, तेच सांगतात. सर्व धर्म आता पैशावर आला आहे. पैसा दिला म्हणजे पाप जाते, प्रायश्चित्त होते, ईश्वर प्रसन्न होतो; असे ब्राह्मण सांगतात पण हे सांगणारे सर्व मूर्ख आहेत. याजवर भरवसा ठेवू नये.' (पत्र क्र. ८८)
 ७. ब्राह्मण इतरांसारखेच :- लोकहितवादींना हे ब्राह्मणमाहात्म्य मुळीच मान्य नाही. इतर जातीत व ब्राह्मणात ते मुळीच फरक मानीत नाहीत. केव्हा केव्हा इतर जातीचे हीन समजले गेलेले लोकच त्यांच्या मते श्रेष्ठ होत. कारण ब्राह्मणांना विद्या नसून गर्व आहे, म्हणून ते सुधारण्याची आशा नाही. इतर अज्ञ असल्यामुळे सुधारणे तरी शक्य आहे. लोकहितवादी म्हणतात, 'भटांत व अतिशूद्रांत मला इतकेच अंतर दिसते की, एक बोलता राघू व एक न बोलता