पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे २१

हा की, हे ब्राह्मण पाठांतरालाच विद्या समजतात. वैदिक, शास्त्री, पंडित, दशग्रंथी ब्राह्मण कोणीही घ्या, त्यांचे भूषण काय तर त्यांनी अनेक ग्रंथ पाठ केले आहेत. लोकांत ज्ञानशून्यता झाली त्याचे हेच कारण आहे. ब्राह्मण लोक वेद पाठ करतात पण अर्थशत्रू असतात. ही सर्व तोंडाची मजुरी झाली. यात मनाचा उपयोग काहीच नाही. लोकहितवादी म्हणतात, 'सांप्रतचे ब्राह्मण विद्येविषयी केवळ जनावरे आहेत. त्यांस अर्थज्ञान नाही. त्यामुळे धर्मावरील भाव व आस्तिकबुद्धी भ्रष्ट झाली आणि वेद, शास्त्र, पुराणे ही मुलांचा परवचा किंवा लमाणांचे गाणे यांसारखी झाली. देवाचे प्रार्थनेस बसले म्हणजे जी मर्यादा, निष्ठा, मनाची तत्परता असावी ती नाही. कारण हे सर्व गुण ध्वनीपासून येत नाहीत. अर्थज्ञानापासून येतात. पण जे पाठ म्हणतात ते अर्थ जाणीत नाहीत. त्यासारखे मूर्ख व व्यर्थ आयुष्य घालविणारे पृथ्वीत थोडेच असतील. मागील युगात असे वेडे ब्राह्मण नव्हते. ते सार्थ म्हणत होते. सार्थ म्हणण्याची पद्धती ज्या दिवसापासून बुडाली, तोच दुर्भाग्याचा फेरा या लोकांस खचित आला.' (पत्र क्र. ३३) व्याकरण, ज्योतिष ही खरे म्हणजे शास्त्रे आहेत. ती नुसती पाठ करण्यात काय फायदा ! वेद किंवा पुराणे यांच्या पठणात पुण्य तरी असेल, पण व्याकरणाचे पठण कशाला ? पण शास्त्रीपंडित व्याकरणही पाठ करतात. बारा बारा वर्षं हे पाठांतर चालू असते. ही विद्या काही उपयोगी नाही. म्हणून लोकहितवादी म्हणतात की, 'मनुष्यास लाकडे तोडावयाचे कसब शिकविले तरी बरे. परंतु हे व्याकरण नको. ही केवळ मूर्ख होण्याची विद्या आहे. त्याचप्रमाणे मीमांसा, अलंकार या शास्त्रांची व्यवस्था आहे. (पत्र क्र. ८६). ज्यास अर्थ परिज्ञान नाही, जे नुसती अक्षरे वाचून पाठ म्हणतात, त्यांचे शब्द जशी जनावरांची ध्वनी तद्वत् आहेत. कारण जनावरांची व मनुष्यांची ध्वनी सारखीच आहे. मनुष्यामध्ये जास्ती इतकेच की ते जे ध्वनी करतात तिचा अर्थ समजतात व दुसऱ्यास कळवितात. हे मनुष्याचे लक्षण अलीकडील ब्राह्मणांत दिसत नाही.' (पत्र क्र. १७).
 ५. पोटभरू विद्या :- केवळ पाठांतराला ज्ञान समजणे ही एक गोष्ट झाली. दुसरी त्यापेक्षा खेदजनक गोष्ट अशी की ब्राह्मणांची सर्व विद्या पोटभरू झाली आहे. लोकांना अज्ञानात ठेवून त्या अज्ञानावर ब्राह्मणवर्ग जगत आहे. लोक आंधळे आहेत, त्यांस डोळे द्यावे, ज्ञान शिकवावे व सुखी होण्याचे मार्ग दाखवावे हे ब्राह्मण मनातदेखील आणीत नाहीत. (पत्र क्र. ९६). लोकहितवादी म्हणतात की, 'मी पंडितास प्रार्थना करून सांगतो की, लोकांचे हित तुमच्याने होणार नाही;