पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२० शतपत्रे

होते. तेव्हा आपणही तोच मार्ग अनुसरावा हे हितावह होय.' (पत्र क्र. २२).
 २. इतर देशांत वर्ण गुणनिष्ठ :- हिंदुस्थानात समाजात भेद आहे तसे इतर देशांतही आहेत. प्रत्येक मुलखात चार वर्ण आहेतच. पंडित, शिपाई, सावकार आणि चाकर असे भेद सर्वत्र आहेत आणि त्यावाचून चालावयाचे नाही, पण इतर देशांत हे वर्ण वंशपरंपरा नाहीत. हिंदुस्थानात तसे आहेत, हेच आपल्या अधःपाताचे कारण होय. इतर मुलखात वाण्याचा मुलगा मूर्ख निघाला तर चाकरात जातो, पण हिंदुस्थानात त्यांची कुळे वेगळाली झाली आहेत. पण ही चाल अलीकडली असावी. पूर्वी नसावी. रावण ब्राह्मणाचा मुलगा, पण तो महादुष्ट होता म्हणून दैत्य झाला. याजवर कित्येक लोक म्हणतात, की ते मागले युगातले लोक. त्यांची उदाहरणे आता घ्यावयाची नाहीत. लोकहितवादींना हे मान्य नाही. कारण, 'वर्ण, व्यापार, जात हे मागल्या युगात होतेच. देवाचे अवतार झाले तरी ती मनुष्येच होती. प्रत्येक जीव देव नव्हता. सामान्य लोक तेव्हाही आतासारखेच होते. म्हणजे दुष्टही होते, सुष्टही होते. फरक इतकाच की तेव्हा ते विचार करीत असत व काही दोष दिसल्यास तो काढून टाकीत असत. आता विचार करीत नाहीत. बहुधा चालीवरून (रूढीवरून) चालतात.' (पत्र क्र. २२).
 ३. तत्कालीन ब्राह्मण :- जातिभेदाविषयीचे आपले विचार याप्रमाणे सांगून नंतर लोकहितवादींनी त्यांच्या काळच्या ब्राह्मण व क्षत्रिय या जातींच्या गुणांचा व कर्तृत्वाचा हिशेब घेतला आहे. त्यातही ब्राह्मण समाजाचे त्यांनी अंतर्मुख होऊन फार कठोरपणे परीक्षण केले आहे. तसे करताना ब्राह्मण समाजाचे अत्यंत घृणास्पद असे अनेक दोष दाखवून त्यांनी भट, भिक्षुक, शास्त्री, पंडित यांच्यावर फार प्रखर, अगदी मर्मभेदक अशी टीका केली आहे. त्यासाठी त्या वेळी त्यांच्यावर फार गहजब झाला आजही ही टीका अन्यायमूलक व द्वेषमूलक आहे, असे कोणी म्हणतात, पण अशा प्रखर टीकेवाचून या समाजाला जाग आली असे वाटत नाही. अज्ञान, अनाचार, हेकटपणा, दुराग्रह, अंधता, लाचारी यांमुळे त्या काळी नवविद्येला पारखा असलेला ब्राह्मण समाज अत्यंत अधोगामी झाला होता, आणि तरीही 'वर्णानां ब्राह्मणो गुरुः ।' ही त्याची अहंता कायम होती. काडीचेही ज्ञान नसताना आपण भूदेव, आपण सर्वज्ञ, हा त्याचा मूढ गर्व पाश्चात्त्य विद्याविभूषितांना अत्यंत संतापजनक वाटे. त्या संतापाचाच आविष्कार लोकहितवादींच्या शतपत्रांतून झाला आहे.
 ४. अर्थशत्रू ब्राह्मण :- लोकहितवादी यांचा ब्राह्मणांवर पहिला आक्षेप