पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे १९



३. जातिभेद


 अज्ञान हा ज्याप्रमाणे हिंदू समाजाचा एक रोग आहे, त्याचप्रमाणे जातिभेद हा दुसरा तितकाच घातक व चिकट रोग होय हे लोकहितवादींनी जाणले होते. त्या विषयावरचे आपले विचारही तितक्याच निर्भयपणे त्यांनी शतपत्रांतून मांडले आहेत. फार प्राचीन काळापासून हिंदू समाजात चातुर्वर्ण्यव्यवस्था रूढ झालेली आहे. उत्तर काळात या चार वर्णांतूनच अनेक जाती, पोटजाती निर्माण झाल्या व त्या सर्व जन्मनिष्ठ व बेटीबंद अशा झाल्या. त्यामुळे या समाजाची शकले होऊन तो दुबळा झाला. समाज असे रूप त्याला राहिलेच नाही. लोकहितवादी म्हणतात की, 'यास उत्तम मार्ग हाच की, कर्मे करून जातीचा आणि वर्णाचा निश्चय करावा. ब्राह्मण असून नीच कर्म करील तर ब्राह्मण नव्हे. तसेच क्षत्रियाने ब्राह्मणकर्म केले तर तो ब्राह्मण व्हावा. असे केले नाही तर कित्येक अयोग्य लोक ब्राह्मणाचे नावाने मिरवतील आणि कित्येक वास्तविक ब्राह्मण शूद्राचे नावाने आच्छादित राहतील. आज जर कोणी राजाने नियम केला की, आजचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांचे अधिकार वंशपरंपरा चालवावयाचे तर जोपर्यंत हे अधिकारी आहेत तोपर्यंत कामे ठीक चालतील. पण त्यांची मुले मूर्ख निघतील. कारण बापाप्रमाणे मुलगा निघतो असा निश्चय नाही. यास्तव ज्याचे त्याचे स्वयमेव गुण पाहून त्याची योजना करावी हा उत्तम पक्ष.' (पत्र क्र. २२).
 १. प्राचीन काळी वर्ण गुणनिष्ठ :- लोकहितवादींच्या मते प्राचीन काळी अशीच व्यवस्था असली पाहिजे. शास्त्रात सर्व वर्ण कुळपरंपरा चालावे असे लिहिले आहे. जो ब्राह्मण त्याचा वंशही ब्राह्मणच. जो शूद्र त्याचा वंशही शूद्रच. असा नियम धर्मशास्त्रात आहे हे खरे, पण प्रत्यक्ष व्यवहारात असे घडत नसावे असे लोकहितवादी म्हणतात व आपल्या या अनुमानाला पुढीलप्रमाणे आधार देतात. 'वाल्मिकी हा प्रथम कोळी होता व नंतर ऋषी झाला. तो अर्थातच आपल्या पुण्यकर्मामुळे झाला. गाधिराजा प्रथम क्षत्रिय होता, पण तपश्चर्या करून तो ब्राह्मण झाला. पराशर ऋषीने शूद्र स्त्री केली. (मत्स्यगंधा. तिचाच मुलगा व्यास) हरिश्चंद्राने काशीस जाऊन महाराचे कर्म पत्करले. त्या काळी कित्येक राजे क्षत्रिय असता ब्राह्मण होत व कित्येक ब्राह्मण असता क्षत्रिय होत. पुराणात अशी वर्णने विपुल आहेत. तेव्हा त्या काळी गुणकर्मावरून वर्ण किंवा जाती ठरवाव्या अशीच चाल असेल. त्या काळचा इतिहास लिहिलेला नाही म्हणून पक्के सांगता येत नाही. पण विचार करून तशी चाल पुष्कळ होती, असे सिद्ध