पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८ शतपत्रे

भूगोल नाही. रूस कोठे आहे, अरबस्थान कोठे आहे, हिंदुस्थानचे क्षेत्रफळ काय, हे संस्कृत पंडित सांगू शकतील काय ? त्यांना एवढेच माहीत आहे की, मेरूपर्वत भूमीच्या मध्ये आहे. तो लक्ष योजने उंच आहे. स्वर्गाची वाट हिमालयातून आहे. गंगा, यमुना या देवता आहेत. संस्कृतात यंत्रज्ञान तर मुळीच नाही. कोण्या पंडिताने कधी यंत्र केले आहे काय ? यंत्राची सुधारणा तरी केली आहे काय ? जे जाते व्यासांचे वेळेत होते तेच आत आहे. पंडितांनी कागद कधी केला आहे काय ? रामराज्यापासून ताडपत्रावर लिहितात तसेच अजून लिहितात.' संस्कृत विद्येची अशी स्थिती असल्यामुळे लोकहितवादी निक्षून सांगतात की, 'संस्कृतचा इतकाच उपयोग आहे की, लोकांमध्ये भ्रांती उत्पन्न व्हावी. जो जो मनुष्य त्यात प्रवीण होतो तो तो अज्ञानसमुद्रात तो खोल खोल जात असतो. (पत्र क्र. १०१). म्हणून ज्ञानप्राप्ती करून घ्यावयाची असेल तर इंग्रजी विद्येचाच आश्रय केला पाहिजे आणि त्या भाषेतल्याप्रमाणे मराठीत ग्रंथ लिहिले पाहिजेत. याच अर्थाने लोकहितवादींनी म्हटले आहे की, 'इंग्रजी विद्वान पूर्वी हिंदुस्थानात एक असता तर राज्य न जाते ? याचा भावार्थ हाच की ती विद्या येथे असती तर आम्ही इतिहास, भूगोल, गणित, रसायन, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांत प्रवीण झालो असतो आणि मग आम्ही पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारानंतर गेल्या शंभर वर्षांत जसे संघटित व समर्थ झालो, तसे आधीच झालो असतो व मग अर्थातच आपले राज्य गेले नसते. पण हे भट, कारकून, मूर्ख जमा झाले म्हणूनच राज्य बुडाले. जर विद्या पहिल्यासारखी असती तर हिंदू लोकांची अशी अवस्था न होती. परंतु ही जनावरे पाहिजे तेथे दोरीने बांधावी अशी गरीब, म्हणून असे झाले. पुढे जरी हिंदू लोकांचे कल्याण झाले, तर इंग्रजी पंडितांचे हातून होईल, यात संशय नाही. कारकून व भट हे क्षीण झाले म्हणजे व इंग्रजी विद्या वृद्धिंगत झाली म्हणजे हिंदू लोकांना पूर्वस्थितीवर येण्यास उशीर लागणार नाही.' (पत्र क्र. ३१). लोकहितवादींची ही भविष्यवाणी आज अक्षरशः खरी ठरली आहे. गेल्या शंभर वर्षांत भारताचे यच्चयावत सर्व नेते, रानडे, विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, महात्मा गांधी, पंडित नेहरू हे, इंग्रजी पंडित- पाश्चात्त्यविद्याविभूषित- होते. शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, इतिहासतज्ज्ञ, अर्थवेत्ते, धर्मशास्त्रवेत्ते सर्व इंग्रजी पंडित होते. त्यांनी आपल्या रसनेने व लेखणीने या देशात राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता, विज्ञाननिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी पाश्चात्त्य समाजरचनेची मूलतत्त्वे रुजविली. त्यामुळेच हा समाज संघटित होऊन स्वातंत्र्यप्राप्तीला समर्थ झाला.