पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे १७

त्याजवर काही नवीन कल्पना काढू नये. काढली तर देवाचा अपमान होतो व जे काय आहे ते त्यात आहे, अशी समजूत पडून लोक अगदी मूर्ख झाले.' (पत्र क्र. ८२).
 ८. संशोधन संपले :- संस्कृत विद्येला अवकळा येण्याचे लोकहितवादींच्या मते हे मुख्य कारण आहे. त्यामुळे आजच्या संस्कृत विद्येतील सर्व ज्ञान मृतावस्थेत आहे. पाच हजार वर्षांपूर्वीचे वैद्यकशास्त्र आज कसे चालणार ? त्यात नित्य संशोधन झाले पाहिजे तरच ती विद्या जिवंत राहील, पण शब्दप्रामाण्य असल्यामुळे संशोधन थांबले आणि सर्व विद्या साचलेल्या पाण्यासारख्या होऊन बसल्या. 'धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ही सर्व प्राचीन काळी लिहिली गेली, आणि सांप्रत कालास फरक पडला आहे, त्यामुळे आज प्रत्यक्षात व शास्त्रात मेळ पडत नाही. प्रत्येक वेळी लोकस्थिती पाहून धर्मशास्त्रात परिवर्तन केले पाहिजे. पण असे न झाल्यामुळे आमचे धर्मशास्त्र व त्याचबरोबर इतर शास्त्रे अगदी निरुपयोगी झाली आहेत.' (पत्र क्र. ३०, ५९) आणि हे फक्त मोठ्या शास्त्रग्रंथांत झाले असे नाही तर सर्व जीवनातच हा प्रकार घडला. 'सर्व कसबी लोक, लोहार, सुतार, तांबट हे बापाच्या विद्येच्या पलीकडे जातच नाहीत. त्यामुळे त्यांची कारागिरीसुद्धा तीन हजार वर्षांपूर्वी जशी होती तशीच आज आहे. तीत अणुमात्र प्रगती झालेली दिसत नाही. नवीन कल्पना त्यांना सुचतच नाहीत. तांबट पूर्वी जसा तांब्या करीत होते तसाच आजही करतात. पोथी जशी पूर्वी लिहीत होते तशीच आता लिहितात. छापणे, यंत्रे करणे ही विद्या येथे आलीच नाही. नवीन गणित नाही, भूगोल नाही, नवीन कायदा नाही. फार काय ज्या वस्तऱ्याने आज हजामत करतात तो पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. काही अधिक कल्पना कोणी चालविली नाही. (पत्र क्र ८२). हे सांगून लोकहितवादी म्हरतात की, प्राचीन काळाविरुद्ध अशी टीका केली की त्यास अधर्म म्हणतात !
 ९. भ्रांत संस्कृत विद्या :- संस्कृतातल्या प्राचीन विद्या जुनाट, जीण झाल्या, त्यामुळे त्यांचा उपयोग नाही आणि आर्वाचीन काळात काल्पनिक भ्रांतिष्ट लिखाणाखेरीज तिच्यात दुसरे काही झालेच नाही. 'संस्कृतात इतिहास नाही. भारतात राज्ये किती होती, कोणाची होती, ती बुडाली केव्हा, कशामुळ बुडाली, मुसलमान केव्हा आले, पाश्चात्त्य केव्हा आले याविषयी संस्कृत पंडितांचे ज्ञान, नांगरहाक्याइतकेच असते. कलियुगास पाच हजार वर्षे होत आली असे सांगतात. तर त्याचा इतिहास कोठे आहे ? याचे उत्तर पंडित काय देणार ? दुसरे, संस्कृतात