पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६ शतपत्रे

विचारांचा उद्घोष करतो. या नव्या सामर्थ्याची महती लोकहितवादींनी शंभर वर्षांपूर्वीच ओळखली हा त्यांचा विशेष. प्रत्येक इंगजी ग्रंथामध्ये त्यांना या सामर्थ्याची प्रतीती येत होती. म्हणून आपल्या लोकांनी ग्रंथ लिहावे असे त्यांनी सारखा उपदेश चालविला होता. आणि अनेक ग्रंथ रचून आपल्या उपदेशाला कृतीची भक्कम साथ दिली होती. इंग्रज विद्वानांचा गौरव करताना लोकहितवादी म्हणतात, 'त्यांची योग्यता अशी आहे की, त्यांस कोणताही विषय सांगा, त्या दिवशी तो ग्रंथ लिहू शकेल. कोणत्याही विषयावर बोलू शकेल. जे जे या पृथ्वीवर आणि आकाशात आहे ते सर्व त्यास ठाकठीक दिसते. आणि चंद्र फिरतो याचे त्यास आश्चर्य वाटत नाही. दगड वरती उडविला म्हणजे खाली पडतो याचेदेखील कारण त्यास माहीत आहे. तात्पर्य त्यास कोणत्याही विषयी आश्चर्य वाटत नाही.' हे शेवटचे वाक्य फारच मार्मिक आहे. पाश्चात्त्य व पौर्वात्य जगातला भेद लोकहितवादींनी या एका वाक्यात फार सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. भारतीयांना सृष्टिघटनांचे ज्ञान मुळीच नव्हते. त्यामुळे त्यांना त्या घटना म्हणजे सर्व चमत्कार वाटत. ईश्वरी करणी वाटत, म्हणूनच त्यांना त्याचे आश्चर्य वाटे. या ज्ञानाच्या बळावरच त्यांनी आगगाडी, तारायंत्रे इ. शोध लावले होते. पण भारतीयांना त्या सर्व ईश्वरी करणी वाटत. चमत्कार वाटत. म्हणून ते ती यंत्रे पाहून आश्चर्यमूढ होऊन गेले होते. माणूस आश्चर्यमूढ झाला की तो हतबल झालाच म्हणून समजावे. लोकहितवादींच्या त्या वाक्यात एवढा अर्थ सामावलेला आहे. ग्रंथांचे महत्त्व त्यांना का वाटत होते, ते आता स्पष्ट होईल. ग्रंथ जसजसे निर्माण होतील, तसतसे आपण आश्चर्यमुक्त होऊ व म्हणूनच समर्थ होऊ.
 ७. संस्कृतातले प्राचीन ग्रंथ :- संस्कृत विद्येवर लोकहितवादींचा आक्षेप हाच होता की, तीत ग्रंथ नाहीत. त्यांच्या मते प्राचीन काळी, व्यासांच्या काळी या भूमीत असे ग्रंथ होत असत. 'प्राचीन काळी म्हणजे तीन हजार वर्षांपूर्वी मोठे मोठे ऋषिवर्य विचारशील होते. त्यांनी रानात बसून ग्रंथ लिहिले. आकाशात नक्षत्रे पाहून त्यांचे नियम लक्षात आणले. रानातील औषधे शोधून त्यांचे गुण लक्षात आणले. आणि त्याविषयी शेकडो ग्रंथ लिहिले. या प्रकारे नाना प्रकारचे ग्रंथ पूर्वी नवीन बुद्धिबळाने उत्पन्न झाले. त्यानंतर या लोकांस पुढे अवदशेचा पाया येणार म्हणून अशी समजूत पडली की, पहिले ऋषी ज्यांनी हे ग्रंथ लिहिले ते सर्व देवअवतारच होते व त्यांनी केले तसे मनुष्य जातीच्याने होणार नाही. आपला धर्म इतकाच की, पूर्वीज्यांनी जे करून ठेविले तितके मात्र शिकावे.