पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे १५

गेल्या शंभर वर्षांतले या देशातील सर्व क्षेत्रांतील थोर पुरुष, नेते, तत्त्ववेत्ते, राजकारणी, वक्ते, धर्मप्रवक्ते, इतिहासकार, गणिती, कवी, कादंबरीकार, कलाकार हे बहुतेक सर्व इंग्रजी विद्याविभूषित होते. त्यावाचून त्यांना या पदाला जाणे शक्यच नव्हते, ही एकच गोष्ट आपण ध्यानात घेतली तरी इंग्रजी विद्येचा इतक्या तळमळीने पुरस्कार केल्याबद्दल लोकहितवादींना आपण शतशः धन्यवाद देऊ. आणि त्यांच्या लेखनातील अत्युक्ती मनाला बोचू न देता तिचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू.
 'इंग्रजी विद्या' या आपल्या पत्रात लोकहितवादी म्हणतात, 'आम्हास ठाऊक आहे की, एक इंग्रजीतील विद्वान् आणि शंभर संस्कृतमधील पंडित आणि एक लक्ष कारकून व दोन लक्ष भट हे सारखेच कदाचित होणार नाहीत. ज्याने चार शास्त्रे अध्ययन केली आहेत त्यांचीदेखील योग्यता इंग्रजीतील पंडितांशी बरोबर नाही; कारण की, आधी संस्कृत भाषेत ग्रंथ किती आहेत ! ग्रंथांच्या संख्येवरून विद्येची तुलना होते हा नेम आहे. इंग्रजीमध्ये कोट्यवधी ग्रंथ आहेत. त्यात अनेक विद्या आहेत, तितक्या संस्कृतांत नाहीत. जसे हिंदू लोक व्यासांचे वेळी विद्याप्रविण होते तद्वत् इंग्रज आज आहेत. त्यांचे चित्त विद्येवर फार व ते ज्ञानी बहुत झाले.'
 ६. ग्रंथमाहात्म्य :- ग्रंथ लिहिणे ही लोकहितवादी विद्वत्तेची खरी कसोटी मानतात व ती अगदी योग्य आहे याविषयी दुमत होईल असे वाटत नाही. पाश्चात्त्य देशात एकेका ग्रंथाने समाजात क्रांती करून टाकली आहे व शंभर शंभर वर्षे लोकांवर आपली सत्ता चालविली आहे हे विद्वानांना ठाऊक आहेच. बेकन, गॅलिलिओ, देकार्त, कोपरनिकस, केप्लर यांना अर्वाचीन युरोपचे जनक म्हणतात. हे सर्व ग्रंथकार होते. लोकहितवादींना असलेच ग्रंथकार मनात अभिप्रेत आहेत. दीर्घ अवलोकन करून, संशोधन करून, जे या भौतिक सृष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेतात व त्यावरून निघणारे सिद्धान्त निर्भयपणे जगापुढे मांडतात तेच खरे ग्रंथकार होत. 'छापण्याची कला' या पत्रात लोकहितवादी म्हणतात, 'वृत्तपत्रे म्हणजे बृहत्तर जिव्हा असे समजले पाहिजे. याचा उपयोग इंग्रज लोक जसा करतात तसा आपले लोक करून शहाणपणा वाढवितील तर फार चांगले होईल. आणि हा समय असा आहे की, आत आपले मनातील गोष्ट उघडपणे व निर्भयपणे सांगता व कळवता येते असे पूर्वी नव्हते.' (पत्र क्र. ७). असा निर्भय माणूसच ग्रंथकार होऊ शकतो. आज आपण व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य या नावांनी याच