पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४ शतपत्रे

लोकहितवादींनी केलेले आहे, आणि आपली प्रगती इतकी मंद आहे की अजून शंभर वर्षे तरी त्यांनी प्रतिपादलेली तत्त्वेच आपणास पुरत राहतील. असे असल्यामुळे त्यांनी सांगितलेली ही सुधारणेची तत्त्वे कोणती ते पाहणे अगत्याचे आहे.
 ५. इंग्रजी विद्या :- अज्ञान ही जर आपली पहिली व्याधी आहे तर विद्येची उपासना, ज्ञानासाठी तपश्चर्या हा त्यावर पहिला उपाय होय, हे ओघानेच आले; मात्र ज्या विद्येची उपासना, करावयाची ती विद्या म्हणजे लोकहितवादींच्या मते इंग्रजी विद्या होय. त्यांच्या मते त्या काळी जुन्या संस्कृत विद्येचा कसलाही उपयोग नव्हता. 'याप्रमाणे कोणतेही भागात जरी पाहिले तरी संस्कृत विद्या निरुपयोगी व नाना प्रकारचे कुतर्क उत्पन्न करणारी व संसारावरील चित्त उडवून आळशी करणारी व निरुपयोगी कर्मे करणारी आहे. सांप्रत काळी जे ज्ञान पाहिजे ते त्यात मुळीच नाही. सांप्रत काळचे देश, तेथील राज्ये व फौजा व व्यापार, इत्यादिकांची माहिती, यंत्राची उत्पत्ती, कायदेकानू कसे असावेत, गैरचाली कोणत्या आहेत, टाकाव्या कोणत्या, ठेवाव्या कोणत्या हे त्यांस माहीत नसते.' असे त्या विद्येविषयी त्यांनी आपले मत अनेक ठिकाणी सांगितले आहे. (पत्रे क्र. ७७, ८२, ८४) आणि आज इंग्रजी विद्याच आपल्याला सर्वतोपरी तारक होईल हे मत अत्यंत हिरीरीने मांडले आहे.
 ते म्हणतात, 'आमचे काळी इंग्रजांसारखे शहाणे, पराक्रमी, ऐश्वर्यवान व विद्वान कोठे नाहीत व त्यांच्या विद्या हिंदूस अश्रुत आहेत. याजकरिता सर्वांनी त्यातील ज्ञान घ्यावे व त्याचा धिक्कार करू नये. सांप्रत इंग्रजीत ज्या विद्या, भूभोल, खगोल, राज्यनीती, इत्यादिक आहेत, त्यांचा विचार करावा, म्हणजे तुम्हास फार संतोष होईल. असे केल्याशिवाय लोकांस कोणतेही कार्य नीट करता येणार नाही.' (पत्र क्र. ६९). लोकहितवादींचे हे मत पुढे सर्वमान्य झाले हे आपण पाहतोच आहोत. त्यांच्यावर प्रखर टीका करणारे विष्णुशास्त्री यांनी तर इंग्रजी विद्येस वाघिणीचे दूध म्हटले आहे आणि 'आमच्या देशाची स्थिती' या आपल्या निबंधाचा समारोप करताना 'ज्ञानसाधना' हा आपल्या देशाला एकच तरणोपाय आहे असे सांगितले आहे. अखिल भारतात पुढच्या पन्नाससाठ वर्षांत अत्यंत निष्ठेने सर्व प्रांतात लोकांनी सर्व मतभेद विसरून जर एकच कोणते कार्य केले असेल तर ते म्हणजे इंग्रजी विद्येच्या प्रसाराचे. शाळा, महाविद्यालये व वृत्तपत्रे ही साधनत्रयी त्यांनी या कार्यासाठी वापरली आणि भावी उत्कर्षाचा पाया घातला.